चंद्रपूर - प्रशासनाच्या योग्य प्रयत्नाने आणि सुदैवाने जिल्ह्यात कोरोनाचा एकही रुग्ण आढळलेला नाही. जिल्ह्याच्या सर्व सीमा बंद केल्या असून कोणालाही ये-जा करण्यास बंदी घालण्यात आली आहे. मात्र, या परिस्थितीतही जिल्ह्यातील काही कर्मचारी आणि अधिकारी हे नियम धाब्यावर बसवून दुसऱ्या जिल्ह्यात असलेल्या आपल्या घरी जात आहेत.
हे अधिकारी आणि कर्मचारी जात असलेल्या अनेक जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्याने ते रेड झोन घोषित करण्यात आले आहेत. ही बाब जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकांच्या चिंतेत भर टाकणारी आहे. जिल्ह्यात विविध विभागात कार्यरत असलेले जवळपास शंभर ते दीडशे अधिकारी, कर्मचारी अशा प्रकारे आपल्या अधिकारांचा गैरवापर करून आपल्या गावी जाऊन परत येत असल्याची माहिती आहे. या प्रकारामुळे चंद्रपूर जिल्हा हा धोकादायक वळणावर असल्याचे दिसून येत आहे. अशा लोकांवर प्रशासनाने तत्काळ आणि कठोर कारवाई करणे गरजेचे झाले आहे.
कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊन हा एकच पर्याय सध्या प्रभावी आहे. यासाठी सरकारने जिथे आहात तिथेच राहण्याचे आवाहन केले आहे. संक्रमण पसरू नये यासाठी प्रत्येक जिल्ह्याच्या सीमा तातडीच्या सेवा वगळता पूर्णपणे बंद करण्यात आल्या आहेत. मात्र, याचा दुरुपयोग जिल्ह्यातील काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून केला जात आहे. हे लोक आपले ओळखपत्र घेऊन शेकडो किलोमीटर दूर असलेल्या आपल्या कुटुंबाला भेटत आहेत. याची कुठलीही पूर्वसूचना प्रशासनाला नाही.
मुल तालुक्यातील एक अभियंता तर चक्क रत्नागिरीला जाऊन आला, तर नगर परिषदेचा एक कर्मचारी वाशीमला जाऊन आल्याची माहिती समोर येत आहे. जिल्ह्यातील एका पंचायत समितीचा संवर्ग विकास अधिकारी नागपूर येथे जाऊन आला. विशेष म्हणजे हे सर्व जिल्हे कोरोनाचे रेड झोन म्हणून घोषित करण्यात आले आहे. यापैकी एकालाही कोरोनाचे संक्रमण झाले तर चंद्रपूर जिल्ह्यावर कोरोनाचे संकट कोसळेल. जिल्ह्यातील जवळपास शंभर ते दीडशे असे कर्मचारी, अधिकारी असल्याची माहिती आहे.
प्रशासनाने असे प्रकरण निदर्शनास आलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहेत. मात्र, यावर आणखी कडक कारवाई होणे गरजेचे आहे. ज्यांच्यावर कायदे, नियमांचे रक्षण करण्याची जबाबदारी आहे त्यांच्याचकडून याची पायमल्ली होत असल्याने यावर त्वरित आळा घालणे अत्यावश्यक झाले आहे.