चंद्रपूर- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देश लॉकडाऊन करण्यात आला आहे. तसेच जिल्ह्याच्या सर्व सीमा सील करण्यात आल्या आहेत. शासन कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सर्वोपरी प्रयत्न करत आहे. अशात रेड झोन क्षेत्रात तब्बल आठवडाभर वास्तव केलेल्या आरोग्य सेविकेने शेकडो बालकांचे लसीकरण केल्याचा धक्कादायक प्रकार कोरपना तालूक्यात समोर आला आहे. या प्रकाराने एकच खळबळ उडाली असून लसीकरण झालेल्या बालकांच्या पालकात भीतीचे वातावरण आहे.
कोरपना तालूक्यातील नारंडा प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत खिर्डी हे उपकेंद्र आहे. या उप-केंद्रात कार्यरत असलेल्या आरोग्य सेविकेचे मामा यवतमाळ येथे राहत होते. त्याचा मृत्यू झाला तेव्हा त्या आरोग्य सेविकेने रेड झोन क्षेत्र असलेले यवतमाळ गाठले. नाकाबंदी असलेल्या श्रेत्रामध्ये ती आरोग्य सेविका आठवडाभर वास्तवाला होती.
आठवडाभर मुक्काम केल्यानंतर ती तीन दिवसापूर्वी कोरपना तालूक्यातील खिर्डी या गावाला आली. या पार्श्वभूमीवर नारंडाच्या वैद्यकीय अधिकार्यांनी त्या आरोग्य सेविकेला विलगीकरण करणे गरजेचे होते. मात्र तिला विलगीकरण न करता उलट त्या आरोग्य सेविकेचा हातातून धामणगाव आणि नैतामगुडा येथील बालकांचे लसीकरण करण्यात आले. शिवाय खिर्डी गावातील नागरिकांना आरोग्य सेवा पुरविण्यात आली आहे. हे सारे घडल्यानंतर ती गडचांदूरला आली. तेथील वार्ड नं.पाच मध्ये एका घरी भाड्याने राहुन ती खिर्डीला सेवा देत आहे.
ही बाब गडचांदूरकराना माहिती होताच त्यांनी नगरपालिका प्रशासनाला याची माहिती कळवली. त्यानंतर पालिका कर्मचाऱ्यांनी रात्री नऊ वाजताच्या सुमारास त्या आरोग्य सेविकेच्या घरी जाऊन तिची चौकशी केली असता प्रथम तिने असे काही घडलेच नसल्याचे सांगितले. पण काही वेळाने तिने सर्व बाबींची कबुली दिली.