चंद्रपूर- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात रक्ताचा तुटवडा असून रक्तदानासाठी नागरिकांनी पुढे येण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत एका नव दाम्पत्याने लग्नसोहळा पार पडल्यानंतर थेट रक्तदान शिबीरात पोहोचून रक्तदान केले. स्वप्नील सोनवणे आणि रेश्मा लाड असे या नव दाम्पत्याचे नाव आहे.
विवाह पार पडताच नव दाम्पत्याने केले रक्तदान.. कोरपना तालूक्यातील बाखर्डी येथील स्वप्नील सोनवणे आणि रेश्मा लाड यांनी साध्या पध्दतीने विवाह सोहळा आटोपला. यानंतर लगेचच त्यांनी रक्तदान शिबिरात हजेरी लावली अन रक्तदान केले. सर्वांनीच रक्तदानासाठी पुढे येणे गरजेचे आहे, असा संदेश कृतीतून देणाऱ्या नव दाम्पत्याचे कौतुक केले जात आहे.
गडचांदूर येथील बालाजी सेलिब्रेशन या मंगल कार्यालयात थोड्या लोकांच्या उपस्थितीत स्वप्नील आणि रेश्मा यांचा विवाह झाला. याच ठिकाणी आमदार सुभाष धोटे मित्र मंडळ,कोरपना मराठी पत्रकार संघ, मुस्लिम युवा मंच यांनी रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. लग्न सोहळा संपन्न होताच वधू-वरांसह काही वऱ्हाडी मंडळींनी देखील रक्तदान केले.
आमदारांनी दिले आशिर्वाद...
आमदार सुभाष धोटे मित्र मंडळ, कोरपना मराठी पत्रकार संघ, मुस्लिम युवा मंच यांनी आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात आमदार सुभाष धोटे यांनी हजेरी लावली. रक्तदानासाठी पुढे आलेल्या नव दाम्पत्याला धोटे यांनी आशिर्वाद दिला.रक्तदान सर्वश्रेष्ठ दान आहे. रक्तदानासाठी तरुणांनी पुढाकार घेण्याचे आवाहन धोटे यांनी केले. शिबिरात 131 जणांनी रक्तदान केल्याची माहीती आयोजक आशिष देरकर यांनी दिली.