चंद्रपूर -जिल्ह्यातील कोरोना रुग्णांमध्ये रविवारी 16 नव्या बाधितांची भर पडली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 276 वर पोहोचली आहे. तर 159 रुग्ण उपचारानंतर बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. रुग्णालयात उपचार घेणाऱ्या बाधितांची संख्या सध्या 117 आहे. सर्व बाधितांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत.
रविवारी नोंद झालेल्या बाधितांमध्ये मूल येथील राईस मिलमध्ये काम करणाऱ्या दोन कामगारांचा समावेश आहे. अनुक्रमे 50 व 25 वर्षीय नागरिकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. 12 जुलैला बिहार राज्यातून कामगारांची एक चमू मूल येथे आली होती. 12 कामगार व एक चालक, असे एकूण 13 जण पॉझिटिव्ह आढळले होते. रविवारी आढळलेल्या दोन कामगारांमुळे (चालक वगळता) एकूण 14 कामगार पॉझिटिव्ह झाले आहेत.
बिहार राज्यातून आलेला एक 45 वर्षीय चालक पॉझिटिव्ह आढळला. राज्य राखीव पोलीस दलाच्या कंपनीमधील आणखी 3 जवान पॉझिटिव्ह आढळले आहेत. जोखमीच्या संपर्कातील असणारे अनुक्रमे 27, 28 व 31 वर्षीय जवान संस्थात्मक अलगीकरणात होते. 16 जुलैला त्यांचे स्वॅब घेण्यात आले होते. त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. चंद्रपूर येथे कार्यरत असलेले 16 जवान यापूर्वी पॉझिटिव्ह आढळले होते. त्यामुळे एकूण 19 जवान आतापर्यंत पॉझिटिव्ह आढळले आहेत.
राजुरा ब्राह्मणवाडा येथील 32 वर्षीय युवक, कोरपना तालुक्यातील पालगाव फॅक्टरीमध्ये काम करणारा चेन्नईवरून परतलेला 30 वर्षीय युवक, गडचांदूर येथील 37 वर्षीय युवक, विदेशातून चंद्रपूर बाबुपेठ येथे परत आलेला युवक, वरोरा येथील 70 वर्षीय पुरुष व 38 वर्षीय महिला, बंगळूरवरून परत आलेला चंद्रपूर येथील 35 वर्षीय युवक, बाबुपेठ परिसरातील 57 वर्षीय नागरिक, जिल्ह्यातील पालगाव येथील सैन्यदलातील जवान, ब्रह्मपुरी तालुक्यातील रानबोथली येथील एका परिवारातील चार वर्षीय बालिका, हे सर्व जण कोरोनाबाधित आहेत.