चंद्रपूर -ओबीसींची जातनिहाय जनगणना करा आणि इतर महत्त्वाच्या मागण्या घेऊन आज (गुरूवारी) राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने जिल्हाभरात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या संघटनेचे राष्ट्रीय समन्वयक डॉ. अशोक जीवतोडे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले.
चंद्रपुरात ओबीसींच्या विविध मागण्यांसाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्यावतीने निदर्शने - ओबीसी आंदोलन
राज्यातील ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणासह विविध मागण्यासाठी आज(गुरुवारी) राज्यभर आंदोलन करण्यात आले. चंद्रपुरातही ओबीसी हिताच्या मागण्यासाठी निदर्शने करण्यात आले.
ओबीसी समाजाची २०२१ मधे होऊ घातलेली जातनिहाय जनगणना केंद्र सरकार करत नसेल तर महाराष्ट्र शासनाने राज्यात ओबीसींची जातनिहाय जनगणना करुन ओबीसी समाजास न्याय मिळवून द्यावा, दिनांक 4 मार्च 2021 चा सुप्रीम कोर्टाच्या ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा निर्णय राज्य सरकारने पुर्ववत करण्याकरीता समर्पित आयोगाची नियुक्ती करुन इम्पेरीकल डाटा गोळा करुन संकलित माहिती सर्वोच्च न्यायालयात सादर करुन ओबीसींचे राजकीय आरक्षण लवकरात लवकर लागु करावे, २४३ डी व २४३ टी या घटनात्मक कलमान्वये घटनादुरुस्ती करुन ओबीसींचे राजकीय आरक्षण २७% निश्चित करा, मराठा समाजाचा ओबीसी संवर्गात समावेश करण्यात येवू नये, क्रिमीलेयरची मर्यादा मागील चार वर्षांपासून न वाढल्याने ती वाढवा, ओबीसी कर्मचाऱ्यांना पदोन्नतीमध्ये आरक्षण द्या, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, नंदुरबार, धुळे, ठाणे, नाशिक, रायगड व पालघर अशा आठ जिल्ह्यातील कमी झालेले आरक्षण पुर्ववत करा, ऑल इंडिया मेडिकल कोटामध्ये ओबीसींच्या कमी झालेल्या जागा पुर्ववत करा, ओबीसींचा बॅकलॉक त्वरित भरा, आधी जातनिहाय जनगणना करा व मगच रोहिणी आयोग लागु करा, राज्यसरकारची मेगा नोकर भरती त्वरीत करावी, राज्य शासनाने एमपीएससी व इतर स्पर्धा परीक्षा त्वरीत घ्याव्या, आदी अनेक मागण्यांवर आंदोलन करून केंद्र व राज्य सरकारांना निवेदन देण्यात आले. यावेळी आंदोलनात राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे सचिन राजुरकर, बबनराव फंड, बबनराव वानखेडे, जिल्हाध्यक्ष नितिन कुकडे, नंदु नागरकर, संदीप आवारी, राजु कक्कड, डॉ. सुरेश महाकुलकर, प्रा. सुर्यकांत खनके, प्रा. अनिल शिंदे, कुणाल चहारे, अजय बलकी, महिला जिल्हाध्यक्ष जोत्सना राजुरकर, पोर्णीमा मेहरकुरे सहभागी झाले होते.
हेही वाचा -ओबीसी आरक्षणाचा प्रश्न फडणवीस सरकारच्या काळापासूनच प्रलंबित- विजय वडेट्टीवार