चंद्रपूर - शाळेने वाढविलेल्या भरमसाठ फीच्या दरवाढीविरोधात पालकांनी आवाज उठविला त्यामुळे त्यांच्या पाल्य विद्यार्थ्यांना शाळेने चक्क पोस्टाने टीसी पाठविल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पडोली येथील नारायणा विद्यालय येथील हा प्रकार असून याविरोधात पालकांनी आवाज उठवला आहे. याबाबत पालकांनी शिक्षणाधिकारी यांच्याकडे तक्रार केली असून विद्यार्थ्यांना पूर्ववत शाळेत घेण्यात यावे तसेच शाळेच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी पालकांनी केली आहे.
शाळेची तक्रार केली म्हणून पाल्यांचे पाठवले टीसी -
पालकांच्या म्हणण्यानुसार, शाळा दरवर्षी 15 टक्के फी वाढ करीत आहे. याबाबत विचारणा केली असता न्यायालयाच्या निर्देशानुसार फी दरवाढीबाबत कुठलेही निकष नसल्याचे सांगण्यात येत होते. मात्र, “महाराष्ट्र खाजगी शिक्षण संस्था अधिनियम 2011" नुसार कुठलीही संस्था ही दर तीन वर्षाला कमाल 15% पर्यंत फी वाढ करू शकते. मात्र ह्या नियमाला तिलांजली देण्यात आली. कोरोनाच्या काळात आर्थिक संकट मोठे होते. याचा फटका अनेक पालकांच्या उत्पन्नावर झाला. मात्र यावेळी देखील फी वाढीत सूट देण्यात आली नाही. याविरोधात अनेक पालकांनी आक्षेप घेतला. तसेच याविरोधात शिक्षणाधिकारी, जिल्हाधिकारी, शिक्षणमंत्री यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला. या तक्रारींमुळे शाळेने तक्रार करणाऱ्या पालकांना त्यांच्या मुलांची टीसी थेट पोस्टाने पाठविण्यात आली. विशेष म्हणजे पालकांनी याबाबत कुठलीही मागणी केली नसताना केवळ सूड उगविण्यासाठी ही कारवाई करण्यात आली असे पालकांचे म्हणणे आहे.