चंद्रपूर- शहरातील बहुचर्चित मनोज अधिकारी हत्याकांडाला आता एक महिन्याहून अधिक काळ लोटला आहे. या खुनातीस मुख्य आरोपी सीमा दाभर्डेपर्यंत अद्याप पोलीस पोहोचू शकले नाही. खुनाचा छडा त्वरित लागावा म्हणून हे प्रकरण स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आले होते. या तरुणीला अटक करण्यासाठी विशेष पथक देखील नेमण्यात आले. मात्र, तरीही आरोपी अद्याप हाती लागलेली नाही. उलट आरोपीने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे. आरोपीचे संबंध अनेक बड्या व्यक्तींसोबत असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे कायद्यापेक्षा या तरुणीचे 'हात' लांब असल्याचे दिसून येते.
अनेक बड्या गुन्ह्यांचा पर्दाफाश करण्यात हातखंडा असलेल्या स्थानिक गुन्हे शाखेसमोर ही आरोपी तरुणी आव्हान म्हणून उभी ठाकली आहे. त्यामुळे, या प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
काय आहे मनोज अधिकारी हत्याकांड प्रकरण
३० सप्टेंबरला कोसारा येथील सिनर्गी वर्ल्ड येथील एका फ्लॅटमध्ये काँग्रेस कार्यकर्ता मनोज अधिकारी यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळला होता. कुऱ्हाडीचे घाव घालून त्यांचा खून करण्यात आला होता. यावेळी घटनास्थळावरून आरोपी रवींद्र बैरागी याला रामनगर पोलिसांनी अटक केली होती. त्याच्या प्राथमिक जबाबावरून नगरसेवक अजय सरकार आणि धनंजय देवनाथ यांना अटक करण्यात आली होती. त्यात चौथे नाव समोर आले ते सीमा दाभर्डे हिचे. तिला अटक करण्यासाठी रामनगर पोलिसांचे विशेष पथक नागपुरात गेले. मात्र, त्यांना ती सापडली नाही.
नगरसेवक अजय सरकार आणि मनोज अधिकारी यांचे वैमनस्य
नगरसेवक अजय सरकार आणि मनोज अधिकारी यांचे वैमनस्य होते. त्यांच्यात एकमेकांवर जीवघेणे हल्ले करण्याच्याही घटना झाल्या होत्या. त्यामुळे, अजय सरकारनेच अधिकारी यांची हत्या केल्याचा दाट संशय पोलिसांना आहे. मात्र, चौकशीत पोलिसांना काही विशेष हाती लागले नाही. रवींद्र बैरागी याने आधीच्या एका जबाबात, हत्येच्या कटात सीमा दाभर्डे आणि सरकारचा सहभाग असल्याचा खुलासा केला होता. मात्र, पुढे चौकाशीत त्याने वारंवार आपले जबाब बदलले. यादरम्यान आरोपींच्या पोलीस कोठडीत दोनदा वाढ करण्यात आली. मात्र, तपास पुढे सरकू शकला नाही.