महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आरटीपीसीआर टेस्ट केलेल्या व्यक्तीच्या हातावर शिक्का मारा - खासदार धानोरकर

आरटीपीसीआर टेस्ट केलेल्या व्यक्तीच्या हातावर ओळख म्हणून शिक्का मारा, अशा सूचना खासदार धानोरकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना केल्या आहेत. यावेळी त्यांनी ऑक्सिजन बेडची उपलब्धता वाढविण्यासाठी खासगी रुग्णालयाचे अधिग्रहण तात्काळ करण्याच्या सूचना आरोग्य यंत्रणांना दिल्या आहेत.

बाळू धानोरकर
बाळू धानोरकर

By

Published : Apr 13, 2021, 10:14 PM IST

चंद्रपूर -जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. दुसऱ्या लाटेत मृत्यूचा दर देखील चिंताजनक आहे. त्याकरिता योग्य नियोजन व टीम वर्क असणे गरजेचे आहे. RTPCR टेस्ट केलेल्या व्यक्तीला २४ तासात रिपोर्ट मिळत नाही. त्यात तो पॉझिटिव्ह आढळल्यास त्याला रुग्णायलात दाखल करण्या करीता आणखी काही तासाचा कालावधी जात असतो. या काळात तो शेकडो लोकांच्या संपर्कात येत असतो. त्यामुळे त्याची RTPCR टेस्ट झाल्यानंतर ओळख म्हणून त्याच्या हातावर शिक्का मारणे बंधनकारक करणे गरजेचे आहे. त्यासोबतच वाढती कोरोना बाधितांची संख्या लक्षात घेता आयुर्वेदिक कॉलेज व महिला रुग्णालय हस्तांतरित करून कोरोना रुग्णावर उपचार करा, अशा लोकहितकारी सूचना खासदार बाळू धानोरकर यांनी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांना केल्या आहेत.

कोरोना उपचाराच्या नावाखाली रुग्णाचे सुरु असलेले शोषण थांबविण्याची गरज आहे. चंद्रपूर जिल्ह्यात केंद्र शासन पुरस्कृत अमृत मेडिकल्समधून कोविड रुग्णांसाठी लागणारे रेमडिसिव्हीर, अँटिव्हायर्ल्डरग्स, अँटिबायोटिक्स, ट्याबलेट्स तात्काळ मागणी पत्र पाठून साठा मागवावा. त्यामुळे गोरगरीब रुग्णांना अत्यल्प दरात औषधी उपलब्ध होतील. त्यासोबतच रेमडिसिव्हीर इंजेक्शनचा काळाबाजार व एच. आर. सी. टी स्कॅन टेस्ट मधील लूट थांबविण्यासाठी दर्शनी भागात दरपत्रक लावणे बंधनकारक करावे. आयसीयू , ऑक्सिजन बेडची उपलब्धता वाढविण्यासाठी खासगी रुग्णालयाचे अधिग्रहण तात्काळ करण्याच्या सूचना खासदार बाळू धानोरकर यांनी आरोग्य यंत्रणांना दिल्या. याबाबत निवेदनाच्या माध्यमातून आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे कोविड प्रतिबंधात्मक लस, ऑक्सीजन व रेमडीसीव्हिंर मुबलक प्रमाणात उपलब्ध करण्याची विनंती केली. जिल्ह्यात पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेत मोठ्या प्रमाणात मृत्यू दर वाढत आहे. हि चिंतेची बाब आहे. या काळात योग्य नियोजन करणे गरजेचे आहे. त्यामध्ये खासगी रुग्णालयाची यंत्र सामुग्री घेऊन खासगी डॉक्टरांची सेवा घेतली पाहिजे. या माध्यमांतून वाढत्या कोरोना रुग्णांवर उपचार करणे देखील सोईचे होणार आहे. त्यामुळे वरील सर्व बावी तातडीने अमलात आणण्याच्या सूचना त्यांनी केल्या. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे थैमान थांबविण्यासाठी सर्वानी योग्य नियोजन करून टीम वर्क करून रुग्णाची व स्वतःची काळजी घ्यावी असे आवाहन खासदार बाळू धानोरकर यांनी केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details