महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आधी लोकप्रतिनिधींशी चर्चा, मग काय ते करा; पालकमंत्र्यांच्या टाळेबंदीला खासदारांचा सुरुंग

सरसकट टाळेबंदी जाहीर करणे हे काही जनतेच्या हिताचे नाही, असे म्हणत खासदार बाळू धानोरकर यांनी पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या टाळेबंदीच्या घोषणेला सुरुंग लावला. या विषयावर त्यांनी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांना सूचना केल्या.

चंद्रपूर
चंद्रपूर

By

Published : Sep 1, 2020, 6:26 PM IST

चंद्रपूर - टाळेबंदीने जिल्ह्यातील अर्थव्यवस्थेचे आधीच कंबरडे मोडले. असंघटित क्षेत्रातील कामगारांना याचा सर्वाधिक फटका बसला. हजारोंच्या संख्येने रोजगार बुडाले. टाळेबंदीत शिथिलता दिल्याने ही स्थिती थोडी का असेना पण पूर्वपदावर येत आहे. तर दुसरीकडे कोरोनाची संख्या भयावहरित्या वाढत आहे. अशावेळी यासाठी लोकप्रतिनिधी आणि टाळेबंदीमुळे प्रभावित होणाऱ्या क्षेत्राचे प्रतिनिधी यांच्याशी चर्चा करून काय तो निर्णय घ्यायला हवा. ते न करता सरसकट टाळेबंदी जाहीर करणे हे काही जनतेच्या हिताचे नाही, असे म्हणत खासदार बाळू धानोरकर यांनी पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या टाळेबंदीच्या घोषणेला सुरुंग लावला. या विषयावर त्यांनी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांना सूचना केल्या. पालकमंत्री यांची टाळेबंदीची घोषणा आणि त्यावर खासदारांनी घेतलेला आक्षेप यामुळे जिल्हा प्रशासनासमोर चांगलाच पेच निर्माण झाला आहे.

चंद्रपूर
राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी जिल्ह्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे 3 सप्टेंबरपासून संपूर्ण जिल्ह्यात टाळेबंदी लागू करू, असे थेट जाहीर करून टाकले. विशेष म्हणजे त्यावेळी केंद्र शासनाचे टाळेबंदी जाहीर करण्यासंबंधीचे कुठलेही आदेश आलेले नव्हते. वडेट्टीवार घोषणा करून मोकळे झाले, पण यामुळे जिल्ह्यात गोंधळ उडाला. यापूर्वी जिल्ह्याने तीनदा टाळेबंदीचे चटके सोसले आहे. यात अर्थव्यस्थेला जबर फटका बसला. त्यामुळे आणखी पुन्हा एकदा टाळेबंदी यामुळे रोजगार, व्यापार, उद्योग क्षेत्रातील लोकांकडून चिंता व्यक्त करण्यात येत होती. सोमवारी खासदार बाळू धानोरकर यांनी शिष्टमंडळासह जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांची भेट घेतली. चर्चेमध्ये महापौर राखी कंचर्लावार, चंद्रपूर शहर काँग्रेस अध्यक्ष रामू तिवारी, उपमहापौर राहुल पावडे, राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष राजीव कक्कड, कापड असोसीएशनचे विनोद बजाज, रेडी असोसिएशनचे दिनेश बजाज, चेंबर ऑफ कॉमर्सचे हर्षवर्धन सिंघवी, सदानंद खत्री, किराणा व्यापारी असोसिएशन रामजीवन परमार, पिंटू मंत्री, एमआयडीसी अध्यक्ष मधुसूदन रुंगठा, छोटे व्यापारी असोसिएशनचे मेनन यांची उपस्थिती होती.

हेही वाचा -केंद्राचे निर्देश येण्यापूर्वीच पालकमंत्र्यांची लॉकडाऊनची घोषणा; जनतेत संभ्रम कायम

यावेळी अनेकांनी अचानक जाहीर केलेल्या टाळेबंदीला विरोध दर्शविला. खासदार धानोरकर यांनी देखील आपली भूमिका मांडली. अजून केंद्र आणि राज्याचे निर्देश न येता अचानक टाळेबंदी जाहीर करणे हे चुकीचे आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखणे हे अत्यंत गरजेचे आहे, मात्र त्यावर अचानक टाळेबंदी लावणे हा काही योग्य पर्याय नव्हे. जर ती लावायचीही असेल तर आधी सर्व लोकप्रतिनिधी, विविध क्षेत्रातील प्रतिनिधी आणि जिल्हा प्रशासन यांच्यात चर्चा व्हायला हवी. यातून जर टाळेबंदी हाच पर्याय येत असेल तर ती नेमकी कशी असेल यावरही सर्वांची मते जाणून घ्यावी, असे खासदार धानोरकर यांनी स्पष्ट केले. धानोरकर यांनी घेतलेली भूमिका वडेट्टीवार यांच्या घोषणेवर पाणी फेरणारी आहे. यामुळे टाळेबंदीचा खरा पेच जिल्हाधिकारी यांच्यासमोर उभा ठाकला आहे. यावर नेमका कुठला निर्णय घेतला जातो हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details