चंद्रपूर - हातठेला चालविणाऱ्या श्रमिकांचे कष्ट कमी करण्यासाठी प्रा. योगेश येनारकर ( handcart made by Yogesh Yenarkar ) यांनी नाविन्यपूर्ण आणि आधुनिक असा हातठेला तयार केला आहे. नुकतेच जागतिक पातळीचे पेटंट हातठेल्याकरिता मिळाले आहे. याबाबतचे वृत्त 'ईटीव्ही भारत'ने प्रकाशित केलेअसता याची दखल काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकरांनी ( MP Balu Dhanorkar meet Yogesh Yenarkar ) घेतली. धानोरकरांनी आवर्जून प्रा. येनारकर यांच्या घरी जाऊन सदिच्छा भेट दिली. त्यांनी केलेले काम समजून घेतले. यासाठी हवी ती मदत करण्याची तयारी दर्शवत त्यांच्या कार्याचे भरभरून कौतुक केले.
असंघटित श्रमिक वर्ग हा सहसा दुर्लक्षित समजला जातो. त्यांच्याकडून वापरला जाणारा हातठेलादेखील पारंपरिक पद्धतीने तयार होतो. हातठेवला आजच्या युगात सोयीस्कर नाही, हे प्रा. येनारकर यांनी हेरले. आपल्या सहकारी विद्यार्थ्यांच्या मदतीने त्यांनी नाविन्यपूर्ण असा हातठेला तयार केला. यात सोयीनुसार ब्रेक, हॉर्न, स्टेअरिंग, इंडिकेटर, पायडल अशा सर्व गोष्टी त्यात समाविष्ट केल्या आहेत. याच्या वापरामुळे श्रमिक वर्गाचा वेळ आणि कष्ट वाचणार आहे.
चंद्रपूरचे नाव जागतिक पातळीवर उंचावले-
तब्बल दहा वर्षांच्या अथक प्रयत्नानंतर हातठेल्याचे जागतिक पातळीचे पेटंट प्रा. येनारकर ( Patent for Hand Cart invention in Chandrapur ) यांना मिळाले. याची बातमी ईटीव्ही भारतमध्ये 22 जानेवारीला प्रकाशित झाली. या वृत्ताची दखल खासदार बाळू धानोरकरांनी घेत थेट प्रा. येनारकर यांच्याशी संपर्क करून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी येनारकर यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांचा आणि त्यांचे सहकारी अमित मुत्यालवार यांचा सत्कार केला. चंद्रपूरचे नाव जागतिक पातळीवर उंचावले याचा एक लोकप्रतिनिधी म्हणून आपल्याला अभिमान असल्याचे ते यावेळी म्हणाले. श्रमिकांच्या समस्यांकडे आजवर कोणी लक्ष दिले नाही. मात्र, नाविन्यपूर्ण प्रयोगामुळे श्रमिकांचे श्रम कमी होणार, असेही धानोरकर यावेळी म्हणाले.