चंद्रपूर - जिल्ह्यात काही दिवसांपासून कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत चालली आहे. त्याची दखल घेत प्रशासनाने शहरातील १६ खासगी दवाखाने अधिग्रहित केले. मात्र, या रुग्णालयातून बाधितांची लुट सुरू असल्याच्या तक्रारी मिळत आहेत. याची दखल खासदार बाळू धानोरकर यांनी घेतली. रविवारी विश्रामगृहात तातडीने बैठक घेत लूट थांबविण्याचे निर्देश दिले.
खासदार धानोरकर यांनी एका दिवसात चौकशी करून अहवाल सादर करण्याच्या सूचना मनपा आयुक्तांना दिल्या होत्या. खासदारांच्या सूचनेप्रमाणे मनपा आयुक्तांनी विविध महत्वाच्या उपायोजना आणि कारवाई केली आहे. त्यासोबतच खासगी अँटीजेन चाचणी केंद्रात केलेल्या चाचणीच्या अहवाल अनेकदा पॉझिटिव्ह येत असतो. तर, त्याच व्यक्तीने शासकीय रुग्णालयात केलेली चाचणी ही अनेकदा निगेटिव्ह येत आहे. सामान्य जनतेची लूट होत असल्याने हे खासगी अँटीजेन चाचणी केंद्र बंद करण्याच्या सूचना खासदार बाळू धानोरकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना केल्या. या बैठकीला मनपा आयुक्त राजेश मोहिते, जिल्हाध्यक्ष ओबीसी कमेटी उमाकांत धांडे, प्रवीण पडवेकर, गोपाळ अमृतकर, एन. एस. यू. आय प्रदेश महासचिव कुणाल चहारे, ज्येष्ठ नेते विनोद दत्रात्रय, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष सोहेल रजा, मनपाचे वैद्यकीय अधिकारी अविष्कार खंडारे यांची उपस्थिती होती.