चंद्रपूर: खासदार धानोरकर म्हणजे आक्रमक आणि रोखठोक व्यक्तिमत्त्व अशी त्यांची ओळख होती. वयाच्या 48 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून त्यांचे स्वास्थ्य बिघडले होते, त्यांना किडनीचा त्रास होता. यातच त्यांच्या स्वास्थ्यात आणखी गुंतागुंत निर्माण झाली होती. त्यामुळे नागपूरहुन त्यांना दिल्ली रवाना करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मावळली. आज सकाळी त्यांचे पार्थिव विमानाने नागपुरात आणण्यात आले. आज वरोरा येथील त्यांच्या निवासस्थानी ते ठेवण्यात येणार असून उद्या त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
आमदार प्रतिभा धानोरकर यांना शोक अनावर: नागपूर विमानतळावर खासदार बाळू धानोरकर यांचे पार्थिव पोचल्यावर कॉंग्रेसचे माजी मंत्री सुनील केदार आणि आमदार विजय वडेट्टीवार यांनी धानोरकर यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले. यावेळी बाळू धानोरकर यांच्या पत्नी प्रतिभा यांना शोक अनावर झाला. त्यांची स्थिती पाहता सुनील केदार यांनी पुढे होत त्यांना आधार दिला. शिवानी वडेट्टीवार यांनी त्यांना सांभाळून घेतले. यावेळी संपूर्ण धानोरकर कुटुंब सोबत होते. दीड वाजता धानोरकर यांचे पार्थिव वरोराकडे रवाना झाले. उद्या सकाळी 11 वाजता धानोरकर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.