चंद्रपूर -चिमूर तालुक्यातील सावरी (बिडकर) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर व लिपिकाने पैशांची अफरातफर केल्याप्रकरणी शेगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. त्यांनी कर्मचारी आणि गरोदर माता लाभार्थींच्या तब्बल १० लाख १६ हजार रूपयांची अफरातफर केल्याची तक्रार असून सध्या याचा तपास सुरू आहे.
हेही वाचा...ठाकरे सरकारच्या निर्णयाला खुद्द मंत्री थोरातांच्याच गावातून आव्हान
चिमूर तालुका वैद्यकीय अधिकारी कार्यालय वरोरा अंतर्गत येणाऱ्या सावरी (बिडकर) प्राथमिक केंद्रात कार्यरत वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रकाश खारोडे आणि लिपिक हर्षल फाले यांनी कर्मचाऱ्यांचे जीवन विमा, वेतन भत्ता, आर.डी. खाते यांच्या हप्त्यांच्या पैशांची अफरातफर केल्याचा आरोप आहे. तसेच मानव विकास निधी अंतर्गत आरोग्य केंद्रातील १९६ गरोदर मातांना मिळणारी २०१६ ते २०१९ ची एकूण रक्कम १० लाख १६ हजारांची अफरातफर केल्याची तक्रार जिल्हा परिषद मुख्याधिकारी तथा जिल्हा वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे देण्यात आली होती.
वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणात पोलीस तक्रार करण्यासाठीचे आदेश सावरी (बिडकर) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सध्या कार्यरत असलेल्या वैद्यकीय अधिकारी डॉ. शुभांगी मदनकर यांना दिले होते. त्यामुसार शेगाव पोलीस स्टेशन येथे डॉ. प्रकाश खरोडे आणि लिपिक हर्षल फाले यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली.