चंद्रपूर - जिल्ह्यातील चिमूर-वरोरा या राष्ट्रीय महामार्गाचे कासवगतीने चालणारे काम आणि त्याकरिता वापरण्यात येणाऱ्या साहित्यामुळे येथे धुळीचे साम्राज्य पसरले आहे. या राष्ट्रीय महामार्गाच्या निकृष्ठ कामाची चौकशी करा. अन्यथा मनसेकडून कंत्राटदाराविरोधात सर्जिकल स्ट्राईक करण्यात येईल, असा इशारा मनसे उप जिल्हाध्यक्ष प्रशांत कोल्हे यांनी दिला आहे.
चिमूर-वरोरा या राष्ट्रीय महामार्गाचे काम हे गेल्या ३ वर्षापासून अति संथगतीने सुरू आहे. त्यामुळे रस्त्यावरून जाणाऱ्या प्रत्येक नागरिकांना व दुतर्फा असलेल्या शेतकऱ्यांना धुळीचा त्रास सहन करावा लागत आहे. या मार्गावर कांहीचा अपघाती मृत्यू तर काहींना कायमचे अपगंत्व आले आहे. कंत्राटदाराकडून योग्य ते साहित्य वापरण्यात येत नसल्याने या रस्त्याचे बांधकाम निकृष्ठ काम झाले आहे. यामुळे, या सर्व प्रकाराची त्वरीत चौकशी करून कंत्राटदारावर दंडात्मक कार्यवाही करावी अन्यथा मनसेकडून सर्जिकल स्ट्राईक केल्या जाईल, असा इशारा मनसे उपजिल्हा प्रमुख प्रशांत कोल्हे यांनी दिला.
चिमूरपासून वरोरा पर्यंतच्या राष्ट्रीय महामार्गाचे बांधकाम करणारी कंत्राटदार कंपनी अनियमितपणे काम करीत आहे. तसेच रस्त्यावर पाणी टाकत नसल्याने सर्वत्र धुळीचे साम्राज्य आहे. ज्यामुळे या मार्गावरुन जाणाऱ्या प्रवाशांना धूळ खात मार्गक्रमण करावे लागते. दुतर्फा असलेल्या शेतपिकांवर धुळीचा दुष्परीणाम होऊन उत्पन्नावर परिणाम झाला आहे. उंच सखल रस्त्याने आणि डोळ्यात जाणाऱ्या धुळीने अनेकदा अपघात होऊन काहींना जीव गमवावे लागले तर काही कायमचे अंपग झाले. यामुळे या मार्गाचे काम तीव्र गतीने आणि काळजीपूर्वक व्हावे, अशी मागणी मनसेकडून निवेदनाद्वारे तसेच वर्तमान पत्राद्वारे करण्यात आली.