चंद्रपूर - ब्रह्मपुरी वनविभागांतर्गत येणाऱ्या दक्षिण ब्रह्मपुरी वनक्षेत्राच्या वनपरिक्षेत्र अधिकारी लक्ष्मी शहा यांना कर्मचाऱ्यांशी उद्धटपणे वागणे चांगलेच महागात पडले. कर्मचारी तसेच इतर लोकांच्या तक्रारींचा पाऊस पडल्यामुळे अखेर शहा यांना निलंबित करण्यात आले. शहा यांना सोमवारी मुख्य वनरक्षकाच्या आदेशानुसार निलंबित करण्यात आले.
शहा यांच्यावर ठपका -
शासकीय कामाचा अनुभव नसून कर्मचाऱ्यांशी उद्धटपणे वागण्याचा ठपका शहा यांच्यावर ठेवण्यात आला. तसेच वन्यजीवांच्या हल्ल्यात पाळीवप्राण्यांचा मृत्यू होणाऱ्या पीडित लोकांनाही धमकावल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला. वरिष्ठ वनाधिकारी कर्मचाऱ्यांच्या तक्रारीची दखल घ्यायला लागले आहेत. दक्षिण वनक्षेत्राच्या वनपरिक्षेत्र अधिकारी लक्ष्मी शहा यांच्याकडूनही कर्मचाऱ्यांना उद्धट वागणूक देऊन दमदाटी केली जात होती. तसेच मानसिक त्रास देण्याचा प्रकार सुरू होता. शासकीय कामामध्ये लागणारे साहित्य खरेदी न करता काम करण्यासाठी त्रास देणे, पाळीव प्राण्यांच्या नुकसान प्रकरणांमध्ये लाभार्थ्यांना बनावट केस तयार करण्याची धमकी देणे, कर्मचाऱ्यांचे सीआर खराब करण्याची धमकी देणे, गावातील प्रतिष्ठित नागरिक अशी संपर्क न करता कोणतीही सभा न आयोजित केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला.