चंद्रपूर : सध्या उन्हाळा सुरू असल्याने पाण्याची पातळी खाली गेली आहे. अनेक ठिकाणचे पाण्याचे नैसर्गिक स्त्रोत आटले आहेत. मात्र या स्थितीत निसर्गाचा एक आगळावेगळा चमत्कार बघायला मिळत आहे. कन्हारगाव अभयारण्यातील ( Kanhargaon Sanctuary in Chandrapur ) चोविस तास वाहणारा बोअरवेल कुतूहलाचा विषय ठरला आहे. विशेष म्हणजे हा बोअरवेल मागील तीस वर्षापासून जंगलातील वन्यजीवांची तहान भागवत आहे. नव्यानं घोषित झालेल्या कन्हारगाव अभयारण्यात अश्या दोन बोअरवेल आहेत. ज्यातून चोविस तास पाण्याचा प्रवाह सुरू ( Borewell Never Runs Dry ) असतो.
निसर्गाचा अनोखा चमत्कार :गोंडपीपरी, पोम्बुर्णा तालुक्यातील परिसरातील जंगलाला नुकताच कन्हारगाव अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आले आहे. येथील जैवविविधता आणि घनदाट जंगल यामुळे या अभयारण्याला मान्यता मिळाली आहे. याच अभयारण्यात दोन बोअरवेल अश्या आहेत की, ज्यातून चोवीस तास पाण्याचा प्रवाह सूरू असतो. गावकरी, इथं येणारे वनमजूर यांची तृष्णातृप्ती होते. सातत्याने ओसंडून वाहणाऱ्या पाण्याचा प्रवाहाचा वापर आता वनविभागाने वन्यजीवांची तृष्णा भागविण्यासाठी केला आहे. बोअरवेलमधून ओसंडून वाहणारे पाणी वनतळ्यात सोडले जात आहे. त्यामुळे अभयारण्यातील वाघ, तृष्णभक्षक प्राणी या पाण्यावर तृष्णा भागवितात. निसर्गाचा हा अनोखा चमत्कार आहे. एकीकडे पाण्याचे स्रोत आटत असताना कन्हारगाव येथे बोअरवेलचा झरा ओसंडून वाहत आहे.