चंद्रपूर -राजकारण्यांच्या जीवनात राजकीय प्रगल्भता दाखविण्याचे मोजकेच प्रसंग येतात. त्याचा योग्य लाभ उचलला तर संधीचे सोने होते. अशीच एक संधी पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या वाट्याला आली होती. कोरोनामुळे एकाही रुग्णाचा मृत्यू जिल्ह्यात झाला नसल्याने त्यांनी जिल्हा प्रशासनाचे कौतुक केले. सोबत कोव्हिड केअर सेंटर म्हणून घोषित केलेल्या वनप्रबोधनी इमारतीची मुक्तकंठाने स्तुती केली. येथील सोयीसुविधा इतक्या चांगल्या आहेत, की रुग्ण जास्त दिवस येथे राहण्याची इच्छा व्यक्त करतात, असेही ते म्हणाले. प्रशिक्षण देण्यासाठी तयार केलेली ही देशातील दुसऱ्या क्रमांकाची सुसज्ज इमारत आहे. जी राज्याचे माजी अर्थमंत्री आणि तत्कालीन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांनी पूर्ण झाली. मात्र, या इमारतीची स्तुती करताना वडेट्टीवारांना मुनगंटीवारांचा सोयीस्कररित्या विसर पडला. याची आठवण करून दिली असता त्यांनी 'अरेच्चा हे राहूनच गेले' असे म्हणत त्यांनी मुनगंटीवारांचा उल्लेख टाळला.
जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असले तरी अजून एकही रुग्णाचा मृत्यू झाला नाही, ही बाब अत्यंत दिलासादायक आहे. विशेष म्हणजे अशी नोंद होणारा चंद्रपूर हा राज्यातील एकमेव जिल्हा आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाचे योग्य नियोजन नक्कीच कौतुकास्पद आहे. या 'चंद्रपूर पॅटर्न'चा पाया वनप्रबोधिनी सुसज्ज इमारतीवर रचण्यात आला. देशभरातील वनविभागाच्या कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण येथे घेतले जाणार आहे. त्यांच्या निवासाची उत्तम व्यवस्था येथे करण्यात आली आहे. मात्र, ऐनवेळी कोरोनाचा काळ सुरू झाला. या दरम्यान ही इमारत कोव्हीड केअर सेंटरसाठी उपयोगात आणण्यात आली. येथे प्रत्येक खोलीमध्ये शौचालय आणि स्नानगृहासह इतर सुविधा आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील प्रत्येक कोरोनाग्रस्तांना उपचारासाठी येथेच आणले जाते. जिल्ह्याच्या मुख्यालयात ही इमारत असल्याने येथे आरोग्य यंत्रणेची सुविधा देखील उच्च दर्जाची आहे. त्यामुळे कोरोनाग्रस्त तातडीने बरे होतात.
वडेट्टीवारांकडून वनप्रबोधिनीच्या इमारतीची स्तुती; पण 'अरेच्चा' म्हणत टाळले मुनगंटीवारांचे नाव
पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी एकही मृत्यू न झालेल्या राज्यातील एकमेव चंद्रपूर जिल्हा प्रशासनाची देखील पाठ थोपटली. मात्र, मुनगंटीवारांचे नाव त्यांनी घेतले नाही. उलट आठवण करून दिली असता 'अरेच्चा हे राहूनच गेले' या शब्दात त्यांनी याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले.
तत्कालीन अर्थ, वने व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नातून या वनप्रबोधिनीला मूर्त रूप येऊ शकले. या इमारतीची भुरळ मदत व पुनर्वसन मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनाही पडली. पत्रकार परिषदेत त्यांनी याची जाहीर स्तुती केली. ही इतकी सुसज्ज आणि सुविधायुक्त इमारत आहे, की स्वतः रुग्ण आपल्याला आणखी दोन दिवस राहण्याची इच्छा बोलून दाखवतात असे सांगितले. या दरम्यान एकही मृत्यू न झालेल्या राज्यातील एकमेव चंद्रपूर जिल्हा प्रशासनाचीदेखील पाठ थोपटली. मात्र, मुनगंटीवारांचे नाव त्यांनी घेतले नाही. उलट या आठवण करून दिली असता 'अरेच्चा हे राहूनच गेले' या शब्दात त्यांनी याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले. शेवटी दोन पक्ष म्हटले तर राजकीय विरोध हा आलाच. पण क्वचित असे प्रसंग येतात जेव्हा या फारकतीच्या सीमा मिटवण्याची संधी येते. तशी ती वडेट्टीवारांनाही मिळाली. त्यांनी यात मुनगंटीवार यांचेही नाव जोडले असते तर जिल्ह्यातील जनतेसमोर आशादायक संदेश गेला असता. जिल्ह्याच्या विकासासाठी पक्षीय मतभेद बाजूला सारून एका नेत्याने दुसऱ्या नेत्याचे अभिनंदन केले, असे चित्र उभे ठाकले असते.
राज्याच्या राजकारणात अशी अनेक उदाहरणे आहेत जेव्हा एका राजकीय पक्षाच्या नेत्याने दुसऱ्या पक्षाच्या नेत्याची मुक्तकंठाने स्तुती केली. किंबहुना राज्यातील राजकारणाची ही संस्कृतीच आहे. मात्र, वडेट्टीवारांना या संधीला प्रगल्भ करता आले नाही असेच म्हणावे लागेल.