चंद्रपूर - जिल्ह्याची दारूबंदी सपशेल अपयशी ठरल्याने सप्टेंबर महिन्यात कुठल्याही परिस्थितीत दारूबंदी हटवू, अशी घोषणा पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली होती. मात्र, ऑक्टोबर महिना उजाळला तरी जिल्ह्यातील दारूबंदी उठू शकली नाही. त्याची समीक्षा करण्यासाठी आता पुन्हा दोन समित्या नेमण्यात येणार आहेत. त्यामुळे वडेट्टीवार यांची घोषणा आता हवेत विरली आहे, असे म्हणत आता ते सोशल मीडियावर ट्रोल होऊ लागले आहेत.
1 एप्रिल 2015 ला तत्कालीन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्ह्यात दारूबंदीची घोषणा केली. मात्र, ती आजवर कागदावरच आहे. कारण जिल्ह्याच्या प्रत्येक ठिकाणी दारू सहज उपलब्ध होते आहे. शेजारचे जिल्हे आणि राज्यातून यासाठी मोठ्या प्रमाणात दारुतस्करी केली जाते. यासाठी मोठी यंत्रणा कार्यरत आहे. त्याला काही राजकीय नेते आणि पोलीस अधिकाऱ्यांचे पाठबळ आहे. दारूतस्करीच्या प्रतिस्पर्धेत टोळीयुद्धदेखील सुरू झाल्याची चर्चा आहे. या व्यतिरिक्त आजवर जिल्ह्यात तब्बल 93 कोटींची दारू जप्त करण्यात आली. मात्र, जितकी दारू जिल्ह्यात येत आहे त्या तुलनेत जप्त केलेली दारू ही नगण्य आहे.
विजय वडेट्टीवार यांनी जिल्ह्याचे पालकमंत्रीपदाची सूत्रे हाती घेताच दारूबंदीच्या निर्णयावर घणाघाती प्रहार केला. ह्या दारूबंदीची समीक्षा करण्यासाठी त्यांनी तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली. मार्च महीन्यात हा अहवाल सुपूर्द करण्यात आला. यात दारूबंदी उठविण्याच्या संदर्भात सर्वात जास्त सूचना आल्या. त्यामुळे जिल्ह्यात दारूबंदी उठणार या चर्चेला उधाण आले. या चर्चेला वडेट्टीवार यांनी दुजोरा दिला. कुठल्याही परिस्थितीत सप्टेंबर महिन्यापर्यंत जिल्ह्यातील दारूबंदी हटणार अशी ठाम घोषणा पालकमंत्री वडेट्टीवार यांनी जून महिन्यात केली होती. जिल्ह्यातील समितीच्या अहवालाच्या आधारावर थेट राज्याची कॅबिनेट निर्णय घेईल अशाप्रकारचे वातावरण निर्माण करण्यात आले. त्यामुळे ही वचनपूर्ती करण्यासाठी सप्टेंबर महिन्याची प्रतीक्षा होती. मात्र, ऑक्टोबर महिना उजाडला पण वडेट्टीवार यांच्या आश्वासनाची पूर्तता झालेली नाही. यावर आता वडेट्टीवार हे सोशल मीडियावर ट्रोल होऊ लागले आहे.