चंद्रपूर -दहा बाय तेराच्या अडगळीच्या खोलीतील तिचे जग. आर्थिक स्थिती बेताची असल्याने त्याच खोलीत संसार आणि व्यवसाय चालविण्यासाठीची तारेवरची कसरत. मात्र, दृढ इच्छाशक्ती आणि परिस्थितीशी दोन हात करण्याची तयारी असली की संकटं आणि आव्हानांचे आभाळ देखील ठेंगणे होत जाते. बांबूवर क्यूआर कोड (Bambu QR Code) विकसित करणारी एकमेव भारतीय महिला मीनाक्षी वाळके (Minakshi Walke) यांच्या या असामान्य प्रवासाच्या यशाचे हे आत्तापर्यंतचे टोक जरी असले, तरी त्यांची ओळख केवळ इथवर सिमीत नाही. त्यांनी बांबूपासून तयार केलेल्या हस्तकलेची ख्याती आता सातासमुद्रापार गेली आहे. अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांना यासाठी सन्मानित करण्यात आले आहे. राज्याचे माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी मीनाक्षी यांच्याकडून तयार केलेल्या विषेश राख्या पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना पाठवल्या. देशाचे पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर (Prakash Jawdekar) यांनी मीनाक्षी यांना पुरस्कृत केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार (NCP Leader Sharad Pawar) हे नुकतेच चंद्रपुरच्या दौऱ्यावर होते. त्यांच्या हस्ते मीनाक्षी वाळके यांना सन्मानित करण्यात आले. मात्र, इथवरचा त्यांचा हा प्रवास सोप्पा नव्हता.
- दुःखातून मिळाली प्रेरणा -
26 मे 2014 ला मीनाक्षी यांचा विवाह मुकेश वाळके यांच्याशी झाला. बारावीपर्यंत शिक्षण झालेल्या मीनाक्षीला प्लायवूड किंवा इतर वस्तूंपासून काही कलाकुसरी करण्याची आवड होती. मात्र, 2018 ला एक मोठी घटना घडली. ज्यामुळे त्या हादरून गेल्या. 8 महिन्यांची बाळंतीण असताना त्यांचे बाळ मृत प्रसूत झाले. त्यामुळे त्या नैराश्याच्या गर्तेत गेल्या. त्यातून सावरण्यासाठी पती मुकेश वाळके आणि जवळच्या लोकांनी बळ दिले. घरी राहून त्याच मनस्थितीत राहण्यापेक्षा बांबू प्रशिक्षण केंद्रात हस्तकलेचे प्रशिक्षण घेण्याचा सल्ला त्यांना दिला. 70 दिवसांच्या प्रशिक्षणात त्यांनी बांबूपासून कुठल्या कुठल्या गोष्टी करता येतात त्याचे धडे घेतले. हे केल्याने त्यांचं दुःख विसरायला मदत झाली.
- नागपुरातील प्रदर्शनीतून मिळाली प्रेरणा -
नागपुरात एका प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मीनाक्षी यांनी बांबु प्रशिक्षण केंद्रातून काही वस्तू खरेदी केल्या होत्या. यावस्तुंना येथे येणाऱ्या लोकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. बांबूपासून तयार केलेल्या वस्तू लोक आवर्जून बघतात, खरेदी करतात, हे त्यांच्या लक्षात आले. मग याच आणि यापेक्षा वेगळ्या वस्तू आपणही तयार करू शकतो. हे त्यांना समजलं आणि दृष्टीने त्यांनी आपल्या घरीच काम करायला सुरूवात केली. शेतकऱ्यांकडून ओला, वाळला बांबू खरेदी करायचा आणि त्यापासून राख्या, कुंकुवाचे करंडे, प्रकाशदिवे, बास्केट तयार करायला सुरुवात केली.
- सोशल मीडियाचा उपयोग -
मीनाक्षी यांनी अभिसार इनोव्हेटीव्ह नावाचे फेसबूक पेज तयार केले. यात ज्यांना या कलेची जाण आहे. अशा देशभरातील अनेक व्यक्तींना जोडण्यात आले. त्यावर बांबूपासून तयार केलेल्या वस्तूंचे फोटो टाकायला सुरुवात केली. लोकांना या वस्तू आवडायला लागल्या. ते यावर खरेदीसाठी मागणी करू लागले. विशेषतः राख्या खरेदीसाठी अनेक ऑर्डर मिळू लागल्या. मीनाक्षी यांच्या मेहनतीचे चीज होऊ लागले.
- दिल्लीतील कार्यक्रम ठरला मैलाचा दगड -
सोशल मीडियाच्या प्रसारावरून वीरेंद्र रावत यांचा संपर्क आला. दिल्ली येथे 2019 मध्ये 'मिस क्लायमेट' नावाची सौंदर्य स्पर्धा घेण्यात येणार होती. पर्यावरणपूरक अशी ही थीम असल्याने रावत यांनी विजेत्यांना देण्यात येणारा क्राऊन बांबूपासून तयार करता येईल काय, अशी विचारणा मीनाक्षी यांना केली. यापूर्वी असे काहीच केले नव्हते. मात्र, त्यांनी याला एक आव्हान म्हणून घेत तयार करण्यास होकार दिला. त्यांनी दोनचार प्रकारचे क्राऊन तयार केले त्यातील एकाचे डिझाईन रावत यांना आवडले आणि त्यांनी यावर शिक्कामोर्तब केला. मात्र, अवघ्या सात दिवसांत 16 क्राऊन तयार करण्याचे आव्हान होते. मात्र, अविरत मेहनत करून हे लक्ष्य मीनाक्षी यांनी सध्या केले. मीनाक्षी यांच्या हस्तकलेने प्रभावित होऊन त्यांना या कार्यक्रमाचे आमंत्रण देण्यात आले आणि त्यांना सन्मानित देखील करण्यात आले. हा अनुभव मुठभर मांस वाढविणारा होता, असे मीनाक्षी वाळके सांगतात.
- विदेशातून मागणीला सुरुवात -