चंद्रपूर : Methane Gas : एरवी समुद्राच्या तळाशी आढळणारे नैसर्गिक वायूचे साठे आता चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात सुद्धा (Methane Gas Found In Chandrapur)आढळून आले आहेत. केंद्राच्या पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस मंत्रालयाने या जिल्ह्यात २०१६-२०१७ मध्ये सर्वेक्षण केले. यात चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर, गोंडपिपरी, राजुरा, कोरपना, भद्रावती आणि वरोरा तालुक्यातील भूगर्भात ३३१ वर्ग किलोमीटर क्षेत्रफळात ३७ तर सिरोंचा ब्लॉकमध्ये ७०९ वर्ग कि.मी. परिसरात ४७ दशलक्ष कोटी क्युबिक मीटर एवढे मोठे कोल बेडेड मिथेनचे साठे सापडले आहेत, अशी माहिती भूगर्भ अभ्यासक सुरेश चोपणे (Astronomer Suresh Chopane) यांनी दिली.
चंद्रपूर-गडचिरोलीत सर्वेक्षण : शासनाने यापूर्वी १९९६-९८ मध्ये चंद्रपूर- गडचिरोली जिल्ह्यात या अनुषंगाने सर्वेक्षण केलं होतं. परंतु, प्रगत तंत्रज्ञानाच्या अभावामुळे नैगर्सिग वायूचे साठे शोधण्यात अडचणी आल्या. त्यानंतर सन २०१६-१७ मध्ये या दोन्ही जिल्ह्यातील कोल बेड मिथेन (सीबीएम) च्या साठ्यांकडं शासनाचं लक्ष गेलं. अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून सर्वेक्षण करण्यात आलं. यात नैसर्गिक वायूचे साठे असल्याचं समोर आलं आहे. चंद्रपूरचा ब्लॉक पूर्व विदर्भातील प्राणहिता - गोदावरी बेसिनमध्ये समावेश आहे. या श्रेणी-३ मध्ये येणाऱ्या बेसिनचे सविस्तर संशोधन केल्यानंतर येथे हे साठे आढळले.
सोलार ग्रुपची बैठक आणि सादरीकरण :चंद्रपूर व्यावसायिक ब्लॉक ३३१ वर्ग किलोमीटर भूभागाचा आहे. यात ३७ अरब क्यूबिक मीटर एवढे साठे आहेत तर सिरोंचा ब्लॉक हा ७०९ वर्ग किलोमीटरचा असून त्यात ४७ अरब क्युबिक मीटरचे साठे आहेत. विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशन सोबत या ब्लॉक संदर्भात गेल, लॉयड आणि सोलार ग्रुपची बैठक आणि सादरीकरण झाले होते. पण, पर्यावरण आणि वन कायद्याच्या अडचणीमुळे अजूनही कुण्या कंपनीने हा ब्लॉक घेतला नाही. तरी पुढील संशोधन आणि लिलावा मध्ये हा ब्लॉक घेतला जाण्याची शक्यता अभ्यासक प्रा. सुरेश चोपणे यांनी व्यक्त केली आहे.