चंद्रपूर - हुतात्मा बालाजी रायपूरकर यांच्या स्मरणार्थ चिमूर-वरोरा महामार्गाच्या दुभाजकावर अर्धाकृती पुतळा नागरिकांनी उभारलेला आहे. काल (सोमवारी) सायंकाळी मनोज बालाजी बोकडे (वय ४० वर्ष) या मनोरुग्ण व्यक्तीने या पुतळ्याची तोडफोड केली. नागरिकांनी त्याला पोलिसांच्या स्वाधीन केले असून आरोपी विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
मनोरुग्णाने फोडला हुतात्मा रायपूरकरांचा पुतळा
स्वातंत्र्य चळवळीत सक्रीय आणि प्रभावी सहभागासाठी चिमूर ओळखले जाते. हुतात्मा बालाजी रायपुरकर यांच्या पुतळ्याची तोडफोड झाल्याची घटना घडली आहे.
संपूर्ण देशात सर्व प्रथम तीन दिवस स्वातंत्र्य उपभोगणाऱ्या चिमूरमध्ये १६ ऑगस्ट १९४२ ला रक्तरंजित क्रांती झाली. त्यावेळी इंग्रज पोलिसांच्या गोळीबारात बालाजी रायपुरकर शहिद झाले होते. त्यांच्या या बलिदानाची आठवण सदैव जागृत रहावी यासाठी चिमूर-वरोरा महामार्गावर हुतात्मा रायपूरकर यांचा पुतळा बसवलेला आहे. सोमवारी सायंकाळी मनोरुग्ण मनोजने पुतळ्यासमोरील लाईट आणि पुतळा दोन्हीही फोडले.
हा प्रकार नागरिकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी मनोजला पकडून चोप दिला व घटनेची माहिती चिमूर पोलिसांना दिली. शांतता व सुव्यवस्था टिकवण्यासाठी पोलीस निरीक्षक स्वप्नीन धुळे यांनी मनोज बोकडेला ताब्यात घेतले. प्रशासनाने नविन पुतळा बसवून द्यावा, अशी मागणी नागरीकांनी केली आहे.