चंद्रपूर - कोरोनाच्या काळात क्वारन्टाइन सेंटरमध्ये भोजन पुरवण्याच्या कंत्राटात मोठा घोटाळा झाल्याचे समोर आले होते. यावर महापालिका प्रशासनाने थातुरमातुर चौकशी करत त्याचा अहवाल आमसभेत ठेवला. या मुद्द्यावरून आमसभा चांगलीच गाजली. हा घोटाळा बाहेर काढणारे गटनेते पप्पू देशमुख यांनी 'कुंपणच शेत खातंय', असा आरोप करत सभात्याग केला. विरोध दर्शवत स्वतःचे मुंडन करून या अहवालाला त्यांनी केराची टोपली दाखवली. इतक्या गंभीर विषयावर खरं तर महापौर राखी कंचर्लावार यांनी स्पष्टीकरण द्यायला हवं होतं. मात्र, प्रसारमाध्यमांना कुठलीही प्रतिक्रिया देण्यास महापौरांनी स्पष्ट नकार दिला. त्यात प्रतिक्रिया देण्यासारखे काही नाही, असे म्हणत त्यांनी या घोटाळ्यावर पांघरुण घालण्याचा प्रयत्न केला.
जनतेच्या बळावर निवडून यायचे आणि जनतेच्या पैशाची नाहक लूट होत असल्याच्या गंभीर आरोपावर मात्र मौन बाळगायचे, अशी सोयीस्कर भूमिका सध्या महापौर कंचर्लावार यांनी घेतली आहे. यामधून 'कुंपणच शेत खातंय' या आरोपाला आणखी खतपाणी घालण्याचे काम महापौरांकडून केले जात आहे.
दामदुप्पट दराने नवे कंत्राट
कोरोनाच्या काळात क्वारन्टाइन सेंटरमधील नागरिकांसाठी भोजन पुरवण्याची सोय महापालिकेने केली. सर्वात आधी हे कंत्राट 'सहज कॅटरर्स'ला देण्यात आले. सर्व काही व्यवस्थित असताना अचानक हे कंत्रात रद्द करून रॉयल ऑर्किड हॉटेल्स नामक कंपनीला चढ्या भावात देण्यात आले. यातील अनेक गोष्टींवर ज्यादा दर आकारण्यात आले. त्यामुळे आधीच्या कंत्राटाच्या तुलनेत तब्बल 60 लाख रुपये अधिक मोजायला लागले. हा घोटाळा गटनेते आणि नगरसेवक पप्पू देशमुख यांनी समोर आणला होता.
त्यावर मागील आमसभेत चांगलाच गदारोळ झाला. या प्रकरणात आयुक्त राजेश मोहिते यांनी भूमिका संशयास्पद आहे. त्यामुळे याची चौकशी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे सोपवण्यात यावी अशी मागणी, देशमुख यांनी केली. मात्र, त्यावर महापौर कंचर्लावार यांनी मनपाच्या उपायुक्तांकडून आयुक्तांची चौकशी करणार असल्याचे जाहीर करून या प्रकरणाला आणखी कमकुवत करण्याचे काम केले. कारण एका वरीष्ठ अधिकाऱ्याची चौकशी, ही त्याच विभागातील कनिष्ठ अधिकारी कुठल्याही दडपणात न येता कसा करू शकतो, हा त्यातील महत्वाचा मुद्दा होता. असे उदाहरण मनापाच्या इतिहासातील पहिलेच होते. त्यामुळे या चौकशीचा अहवाल नेमका काय येणार आहे हे अपेक्षित असेच होते.