चंद्रपूर Maya Tigress :ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाची राणी अशी ओळख असणारी माया वाघीण गेल्या अनेक दिवसांपासून दिसेनासी (Maya Tigress Gone Missing) झाली आहे. याबाबत पर्यटक आणि वन्यजीवप्रेमींकडून चिंता व्यक्त केली जात आहे. या वाघिणीचा शोध घेण्यासाठी ताडोबा व्यवस्थापनाने 125 ट्रॅप कॅमेरे लावले आहेत. मात्र अद्याप 'माया वाघीण' ही कॅमेऱ्यात कैद झालेली नाही. मात्र बरेचदा वाघीण आपले क्षेत्र बदलत असते. त्यामुळे मायाने आपले क्षेत्र बदलले की काय यावर देखील चर्चा सुरू झाली आहे.
कोण आहे माया : 'माया वाघीण' ही अत्यंत रुबाबदार अशी वाघीण आहे. तिची अदा आणि तिची एक झलक पाहण्यासाठी पर्यटक वारंवार ताडोबाची वारी करतात. एकदा शिकार मिळण्यासाठी वाघाला अनेकदा प्रयत्न करावे लागतात. मात्र माया वाघीणीला अपवादात्मक असे कौशल्य प्राप्त आहे. शिकार करण्याची अपवादात्मक कला, अत्यंत चाणाक्ष आणि आक्रमक स्वभाव यामुळेच तिला ताडोबावर राज्य करणारी ताडोबाची राणी संबोधले जाते. माया ही यापूर्वी अत्यंत प्रसिद्ध असलेल्या 'माधुरी' या वाघीणीची मुलगी आहे. 2010 मध्ये तिचा जन्म झाला. शिकार करण्याचे बाळकडू मायाला आई माधुरी कडूनच मिळाले. माया ही केवळ ताडोबाची राणी म्हणूनच नव्हे तर, एक चांगली आई म्हणून देखील ओळखली जाते. आपल्या बचड्यांचा अत्यंत काळजीने ती सांभाळ करते. आपल्या बचड्यांशी खेळताना, त्यांच्यावर लक्ष ठेवताना, त्यांना आवाज देताना असे अनेक व्हीडिओ माया वाघीणीचे व्हायरल झाले आहेत. म्हणून समाजमाध्यमात मायाची क्रेझ आहे. 'छोटी तारा' या प्रसिद्ध वाघीणीसोबत मायाची अनेकदा झुंज झाली आहे. मात्र नेहमी मायाने तिला पिटाळून लावले आहे.
शेवटची कधी दिसली माया: माया वाघीणीचे सातत्याने दर्शन हे होत असायचे. मे महिन्यात ती एका दुसऱ्या वाघाबरोबर समागम करताना दिसली. ताडोबा अंधारी व्याघ्रप्रकल्पाच्या कोअर क्षेत्रातील पांढरपौणि येथील तलावाजवळ ती सातत्याने दिसत होती. मात्र पावसाळ्यात ताडोबा सफारी नेहमीप्रमाणे बंद करण्यात आली आणि त्यानंतर तिचे दिसणे बंद झाले. या दरम्यान जंगलात अनेक ठिकाणी पाणी साचल्याने गस्त घालण्यात देखील मोठ्या अडचणी येत असतात. मायाचे शेवटचे दर्शन हे 23 ऑगस्टला झाले होते. यानंतर ती दिसली नाही.
गर्भवती असण्याची शक्यता :मे महिन्यात माया एका दुसऱ्या वाघाच्या सहवासात होती. सात ते आठ दिवस तिचा हा समागम सुरू होता. या दरम्यान ती गर्भवती असण्याची शक्यता ताडोबातील काही अधिकाऱ्यांनी वर्तविली आहे. जेव्हा वाघीण ही गर्भवती होते त्यावेळी ती असे ठिकाण शोधते जिथे सहज शिकार मिळू शकेल, दुसऱ्या वाघांचे वास्तव्य तिथे नसेल, शिकार आणि पाणी सहज उपलब्ध व्हावे. अशावेळी काही महिने वाघीण दिसेनाशी होते. यापूर्वीचा मायाचा सहवास बघता ते गर्भवती असून प्रसूतीसाठी सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित झाली असावी असा प्राथमिक अंदाज आहे, त्याची पुष्टी होण्यासाठी आणखी 15 ते 20 दिवसांचा कालावधी जाणे आवश्यक आहे, यानंतर ती आपल्या बचड्यांना घेऊन बाहेर फिरताना दिसण्याची शक्यता आहे.
मायासाठी 125 ट्रॅप कॅमेरे : माया नेमकी कुठे आहे हे शोधण्यासाठी 125 ट्रॅप कॅमेरे ठिकठिकाणी लावण्यात आले आहेत. हे कॅमेरे पुढे कुठलीही हालचाल झाल्यास फोटो घेतात. या कॅमेऱ्यांची संख्या देखील वाढविण्यात येणार आहे. सोबत गस्त देखील घालण्यात येते आहे.