चंद्रपूर- देशभरात जनावरांची मोजणी होते. मात्र मागील ९० वर्षात ओबीसींची जनगणना झाली नाही. त्यामुळे सन २०२१ च्या जनगणेत ओबीसींचा कॉलम हवा. अन्यथा जनगणनेत सहभागी होणार नाही, असा इशारा हजारो संख्येत एकत्र आलेल्या ओबीसींनी दिला.
ओबीसी जनगणना समन्वय समितीच्या वतीने आज चंद्रपुरात ओबीसींचा विशाल मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात जिल्ह्याभरातून हजारोंच्या संख्येत ओबीसी प्रवर्गातील पुरूष, महिला आणि विद्यार्थी सहभागी झाले होते. या मोर्चात ओबीसी प्रवर्गातील सर्वच जाती समूहांचा समावेश होता. संविधान दिनी आयोजित या मोर्चाचा प्रारंभ दीक्षाभूमी येथून झाला. शहरातील मुख्य मार्गावरून गेलेल्या मोर्चाचा समारोप चांदा क्लब मैदानावर झाला.
कोविडच्या पार्श्वभूमीवर हजारोंच्या संख्येने जमाव -
ओबीसींची जात निहाय जनगणना झालीच पाहिजे, अशा घोषणांनी शहर दणाणून गेले. कोविडची पाश्र्वभूमी असतानाही मोठ्या संख्येत लोक एकत्रित आले. सर्वच राजकीय पक्षांचे नेते या मोर्चात सहभागी झाले होते. मोर्चाचा समारोप चांदा क्लब मैदानासमोर झाला. या मोर्चाचे वैशिष्ट्य म्हणजे सर्वच पक्षांचे राजकीय नेते मोर्चात सहभागी झाले होते. मात्र ते सामान्य ओबीसी कार्यकर्ता म्हणून मोर्चाला हजर होते. विशेष म्हणजे बहुजन कल्याण मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार, खासदार बाळू धानोरकर, आमदार प्रतिभा धानोरकर, आमदार सुभाष धोटे आणि आमदार किशोर जोरगेवार, जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या ताई गुरनुले व्यासपीठाच्या खाली मोर्चेकऱ्यांमध्ये बसले होते. त्यांना जनगणना समन्वय समितीच्यावतीने मागण्यांचे निवेदन देण्यात आले.