चिमूर (चंद्रपूर) -भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषद, नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर रिसर्च इन ट्युबरक्युलोसिस, केंद्रीय टीबी विभाग चेन्नई, आरोग्य व कुंटुब कल्याण मंत्रालय भारत सरकार व जागतिक आरोग्य संघटना यांच्या सहकार्याने देशभरात क्षयरोग अभ्यास व संशोधनाकरिता ६२५ गावांची निवड करण्यात आली आहे. त्यापैकी महाराष्ट्रातून ५२ गांवाची निवड करण्यात आली असून चंद्रपूर जिल्ह्यातून मासळ या गावाची निवड करण्यात आली आहे.
मासळ हे क्षयरोग अभ्यास संशोधनासाठी निवड झालेले जिल्ह्यातील एकमेव गाव - चंद्रपूर क्षयरोग अभ्यास संशोधन बातमी
क्षयरोग अभ्यास संशोधनासाठी चंद्रपूर जिल्ह्यातून मासळ या गावाची निवड करण्यात आली असून अभ्यास संशोधन व सर्वेक्षणाकरिता भारतीय आयुर्विज्ञान संशोधन संस्था पुणेची टीम येथे दाखल झाली आहे.
देशात दररोज पाच हजार व्यक्तींना नव्याने क्षयरोग होत असून क्षयरोगामुळे दररोज एक हजार व्यक्तींचा मृत्यू होतो. देशातील जवळपास ४० टक्के व्यक्तींना क्षयरोग झाला असल्याचा आरोग्य विभागाचा अहवाल आहे. त्यामुळे या रोगावर जागतिक व देशपातळीवर उपाययोजना व नियंत्रणासाठी धोरण ठरविण्याकरिता देश पातळीवर अभ्यास, संशोधन करण्यात येत आहे. भारत सरकार व जागतिक आरोग्य संघटनेतर्फे भारतीय आयुर्विज्ञान संशोधन संस्था पुणेद्वारा देशातील ६२५ गावांची रॅन्डम पद्धतीने निवड करण्यात आली आहे. यात राज्यातील ५२ गावांचा समावेश असून चंद्रपूर जिल्ह्यातून चिमूर तालुक्यातील मासळ या गावाची निवड करण्यात आली आहे.
डॉ. ऋषीकेश आंधळकर यांच्या नेतृत्वात भारतीय आयुर्विज्ञान संशोधन संस्था पुणे या संस्थेची टीम मासळ येथे दाखल झाली आहे. तपासणीसाठी सर्व यंत्रणा व साहीत्याने सुसज्य असे चालते फिरते प्रयोगशाळा असलेले वाहन तयार आहे. या उपक्रमाची सुरूवात जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. प्रकाश साठे, संवर्ग विकास अधिकारी संजय पुरी, तालुका वैद्यकिय अधिकारी डॉ. दिगांबर मेश्राम, डॉ. मिनल पेटकर, डॉ. चेतन धोंगडे, प्रशांत तुरणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. याप्रंसगी गावातील प्रतिष्ठित माजी सरपंच प्रकाश पाटील, ग्रामसेवक प्रशांत लामगे, वामनराव बांगडे, अब्दुल शेख, प्रदिप गंधारे, प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सहायक, परिचर व आशा वर्कर उपस्थित होते.