चंद्रपूर: Maratha Reservation : राज्यात सुरू असलेल्या मराठा आरक्षणाच्या वादाची ठिणगी चंद्रपुरात देखील पडली आहे. (Chandrapur News) मराठा समाजाचं जालन्यात आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांची मराठा समाजाला सरसकट कुणबी समाजात सामील करावे, ही मागणी चुकीची आहे. त्याचा राष्ट्रीय ओबीसी महासंघ विरोध करत असल्याचं ओबीसी नेत्यांनी स्पष्ट केलं आहे.
ओबीसी महापंचायतीचं आयोजन : (Maratha Reservation Protests) जालन्यात झालेला लाठीचार्ज याचा ओबीसी समाजानं निषेध केला आहे. सरकारनं निजामशाहीमधील कुणबी समाजाचे दाखले द्या त्यानंतर कुणबी प्रमाणपत्र देणार असं सांगितलं. मात्र मराठा समाजाकडं निजामशाहीचा पुरावा नसल्यानं, त्यांना ओबीसी समाजात सामील करावं अशी मागणी केली जात आहे. याविरोधात राष्ट्रीय ओबीसी महासंघानं चंद्रपुरात ओबीसी महापंचायतीचं आयोजन (Maha Panchayat March) केलं. या महापंचायतीमध्ये ओबीसी समाज व इतर जातनिहाय जनगणना, ओबीसी समाजाचं वस्तीगृह तात्काळ सुरू करा. तसेच मराठा समाजाला सरसकट ओबीसी वर्गात सामील करू नये, असे ठराव मांडण्यात आले आहेत.
मराठा समाज आर्थिकदृष्ट्या सक्षम :मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावं, मात्र ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता द्या अशी मागणी ओबीसी समाजानं केली आहे. आधीच ओबीसी समाजात तब्बल 423 च्यावर जाती आहेत. त्यामध्ये आता मराठा समाज आला तर ओबीसी समाजाला न्याय मिळणार नाही. मराठा समाज आर्थिक दृष्ट्या सक्षम आहे. जर त्यांच्याकडं निजामशाहीचे दाखले असतील, तर त्यांना आरक्षण द्या. पण सरसकट नको, मराठा समाजानं आजपर्यंत मोठे मोर्चे काढले. परंतु आता आपल्याला एकत्रित होण्याची वेळ आली असल्याचंही ओबीसी समाजाच्या नेत्यांनी यावेळी स्पष्ट केलं.