चंद्रपूर- कोरोनाबाधित चार रुग्णांच्या संपर्कात आलेला व्यक्ती पळून जाऊन त्याच्या सासरवाडीत लपल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने सासरवाडीच्या गावात एकच खळबळ उडाली आणि गावाच्या सरपंचांनी तातडीने ग्रामपंचायत सदस्यांची बैठक बोलावली. यात सदर व्यक्तीचा अहवाल कोरोनाबाधित आल्यास त्या पार्श्वभूमीवर घेण्यात येणाऱ्या दक्षतेवर चर्चा करण्यात आली.
जिल्ह्यात एकाच दिवशी नऊ बाधित रुग्ण आढळून आले. यातील चार रुग्णांच्या संपर्कात आलेली एक व्यक्ती मागील ३ दिवसांपासून गोंडपिंपरी तालुक्यात येणाऱ्या धाबा गावी वास्तवाला होती. धाबा हे त्या व्यक्तीच्या पत्नीचे गाव आहे. तर त्याचे मूळ गाव सिंदेवाही तालुक्यात आहे. तो धाबा गावात असल्याची माहिती आरोग्य विभाग आणि पोलिसांना कळाली. तेव्हा पोलिसांनी त्या व्यक्तीला ताब्यात घेतले. आता त्याला चंद्रपूरला तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. तसेच त्या व्यक्तीच्या सासरवाडीतील कुटुंबीयांना गृह अलगीकरण करण्यात आले आहे.