चंद्रपूर : पाण्यावर तरंगणारा सौर ऊर्जा प्रकल्प लवकरच चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राद्वारे उभारण्यात येणार आहे. विशेष म्हणजे महानिर्मितीचा राज्यातील असा पहिलाच प्रकल्प असणार आहे. चंद्रपूर महा औष्णिक विद्युतकेंद्रालगत इरई धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये 105 मेगावॅट क्षमतेचा फ्लोटिंग सौर प्रकल्प तर भद्रावती तालुक्यात कचराळा येथे 145 मेगावॅट या प्रमाणे 250 मेगावॅटचा सौर ऊर्जा प्रस्तावित आहे. पर्यावरणपूरक हरित उर्जेला प्राधान्य देण्याचा यामागे महानिर्मितीचा मानस आहे.
सविस्तर प्रकल्प अहवाल बनविण्यासाठी सल्लागाराची नेमणूक
सध्या वीज निर्मितीसाठी फार मोठ्या प्रमाणात पाणी व कोळश्याचा वापर केला जातो. परंतु कोळश्याचे साठे मर्यादित असल्याने भविष्यातील विजेची वाढती मागणी लक्षात घेता, महाजनकोने हे महत्वाचे पाऊल उचलले आहे. हे दोन्ही प्रकल्प कार्यान्वित करण्यासाठी व सविस्तर प्रकल्प अहवाल बनविण्यासाठी सल्लागाराची नेमणूक करण्यात आलेली आहे. तसेच पाण्याची खोली मोजण्यासाठी सर्वेक्षण करण्यात आले आहे. या कामाचे क्षेत्र 3.20 चौरस किलोमीटर आहे. विशेष म्हणजे हा प्रकल्प पाण्यावर होत असल्याने जमिनीची बचत होणार आहे सोबत फ्लोटिंग सोलर मुळे बाष्पीभवन होणार नाही आणि पर्यायाने पाण्याची बचत होईल. या प्रकल्पाशी निगडीत इतर स्थापत्य बांधकामासाठी जमीन आणि पाण्याची चाचणी व्हीएनआयटी या नामांकित संस्थेकडून करण्यात आली आहे.