चंद्रपूर - जागृत देवस्थान अशी ख्याती असणाऱ्या महाकाली मंदिरात दरवर्षी नवरात्री दरम्यान भाविकांची गर्दी असते. यासाठी भाविक मराठवाडा, आंध्रप्रदेश आणि तेलंगणातून येत असतात. मात्र, आजवरच्या इतिहासात नवरात्री दरम्यान पहिल्यांदाच इथे शुकशुकाट असणार आहे. कोरोनाचा काळ असल्याने भक्तांच्या अनुपस्थितच येथील सर्वच पारंपरिक अनुष्ठान पार पाडले जाणार आहेत.
महाकाली मंदिराबाबत माहिती देताना व्यवस्थापक सुनील महाकाले सध्या कोरोनाचा प्रकोप सुरू असल्याने सर्व मंदिरे बंद ठेवण्यात आली आहेत. महाकाली मंदिराला देखील याचा मोठा फटका बसला. दरवर्षी येथे महाकालीची यात्रा भरते, नांदेड, उस्मानाबाद, बीड, परभणी येथून लाखोंच्या संख्येने भाविक महाकाली मातेचे दर्शन करण्यासाठी येतात. स्थानिक लोकांची देखील येथे प्रचंड गर्दी असते. मात्र, कोरोनामुळे हे सर्व ठप्प होते. आता नवरात्रात देखील मंदिर परिसरात शुकशुकाट असणार आहे. मात्र, यादरम्यान पारंपरिक पद्धतीचे जे अनुष्ठान आहेत, ते पूर्ण केले जातील, अशी माहिती महाकाली मंदिराचे व्यवस्थापक सुनील नामदेवराव महाकाले यांनी दिली.
असे असते नवरात्रीचे नियोजन
अश्विन नवरात्रीच्या पहिल्या दिवशी महाकाली मातेच्या मूर्तीचा दुग्धाभिषेक, जलाभिषेक केला जातो. मातेवर पारंपरिक दागदागिने चढवले जातात. यानंतर घटस्थापना केली जाते. नंतर दररोज देवीचा दुग्धाभिषेक, जलाभिषेक केला जातो. दुपारी नैवेद्य दाखवला जातो. तर, रात्री आरती केली जाते. अष्टमीला हवन केला जातो. हे अनुष्ठान नवमीपर्यंत सुरू असते. नवमीला सकाळी महापूजा केली जाते. देवीच्या कुंडात पाठ केला जातो. नवमीला गुरुपरंपरेनुसार नांदेड येथून आलेल्या निवडक भाविक या अनुष्ठानात सहभागी होतात. यंदा नवमी आणि दशमी एकाच दिवशी आल्याने नवमीच्या दिवशीच नवरात्रीचे अनुष्ठान संपणार आहे, अशी माहिती मुख्य पुजारी गजाननराव चन्ने यांनी दिली.
महाकाली मंदिराचा इतिहास
देवस्थानाकडून दिलेल्या माहितीनुसार त्रेता युगातील राजा कृतध्वजाचा पुत्र सुनंद यांना याच जागी जमिनित उत्खनन करताना एका भुयारी शिलेवर कोरलेली स्वयंभु, भव्य अशी मुर्ती आढळली. तीच माता महाकाली होय. नंतर द्वापर युगात चंद्राश राजाने मंदिराचा जीर्णोद्धार केला. ऐतिहासिक काळातील गोंडराजा विरशाहची पत्नी राणी हिराईने सुमारे इ.स.१७०४ पुर्वी असलेल्या लहान मंदिराच्या मुळ बांधणीच्या चार खांबावर, पुर्वेस व पश्चिमेस जोडले. खांब तयार केल्यावर सध्याचे कमानयुक्त असणारे मंदिराचे बांधकाम करण्यात आले. राजा विरशाहाच्या पराक्रमाचे प्रतीक म्हणून राणी हिराईने चैत्रपोर्णिमेला महाकाली देवी उत्सवाची सुरवात केली. नांदेड येथील देवी उपासक राजाबाई देवकरिनस याने १८८० साली चैत्रपोर्णिमेला भक्तासोबत १५ दिवस उत्सवरूपी उपासना केली. येथून महाकाली यात्रेला प्रारंभ झाला. मंदिरात मोगल शाही शैलीच्या छाप असलेल्या बाधंकामावर आदित्य पद्धतीचे विशेष चिन्ह वाघ समृद्धीचे प्रतिक हत्ती कोरलेले आहे. तसेच मंदिराचे दक्षिणेकडील भागात कमानयुक्त लालसर कैय्या (गेरू) प्रमाणे चित्र आखलेले आहे. चंद्रपूर हे पुराणिक कालीन प्राचीन व ऐतिहासिक चंद्रपूर नगरी च चंद्राश रूपाने महाकालीचे एक स्थान आडीवरे जिल्हा रत्नागिरी येथे आहे. दुसरे महाकालीचे स्थान अडूळ जिल्हा रत्नागिरी मध्ये आहे. तिसरे महाकालीचे स्थान बारसी टाकळी जि. अकोला येथे आहे. चौथे स्थान कालुका पावागड गुजरात येथे आहे. पाचवे अत्यंत महत्वाचे स्थान चंद्रपुरमध्ये आहे. महाकाली मंदिराचे व्यवस्थापक स्वयं वंशपरंपरेप्रमाणे चालत आहे. त्यांच्या घराण्याच्या सात पिढ्या पासून महाकाली मंदिराचे व्यवस्थापन महाकाले परिवाराकडे आहे.
महाकाले कुटुंबाची तेरावी पिढी
महाकाली मंदिरात पारंपरिक अनुष्ठान करण्याची जबाबदारी ही महाकाले कुटुंबाची आहे. पिढ्यानपिढ्या हे अनुष्ठान ते करीत आहे. आज त्यांची तेरावी पिढी हे कार्य करीत आहे, असे सुनील महाकाले सांगतात. या सेवेमुळेच या कुटुंबाचे आडनाव महाकाले असे पडले.
देवीच्या नावाने होते भाविकांची लूट
वास्तविक महाकाली मंदिर कुठल्याही प्रकारची देणगी स्वीकारत नाही, तसे पावतीबुक देखील नाही. देणगी द्यायची असल्यास महाकाली देवस्थानाचे एसबीआय बँकेचे ऑनलाइन खाते आहे. फक्त इथेच थेट रक्कम दिली जाऊ शकते. मात्र, मराठवाड्यात माता महाकालीचे भाविक मोठ्या प्रमाणात असल्याने त्यांची लूट केली जाते. महाकाली मंदिराच्या नावाने खोटे पावती बुक छापून भाविकांना गंडविले जाते, अशा अनेक तक्रारी आम्हाला प्राप्त होतात, अशी माहिती व्यवस्थापक सुनील महाकाले यांनी दिली.