चंद्रपूर - कोरोनाची दुसरी लाट आल्यामुळे कोरोनाच्या रुग्ण संख्येत मोठी वाढ होताना दिसत आहे. तर दुसरीकडे यापासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी लसीकरणाला देखील सुरुवात झाली आहे. मात्र, असे असताना देखील नागरिक ही लस घेण्यासाठी पाहिजे त्या प्रमाणात उत्सुक नाहीत. तर काही लोकांना लस घ्यायची आहे, मात्र लस विकत घेण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नाहीत, अशा गरीब वर्गासाठी बालरोगतज्ज्ञ डॉ. भावेश मुसळे यांनी पुढाकार घेतला आहे. अशा लोकांना नाममात्र फी घेऊन लसीकरण करण्याची सुविधा डॉ. मुसळे यांनी उपलब्ध करून दिली आहे.
लसीकरण सर्वसामान्य लोकांना उपलब्ध व्हावे या उद्देशाने काही खासगी लसीकरण केंद्रांना देखील परवानगी देण्यात आली आहे. यामध्ये डॉ. भावेश मुसळे यांच्या रुग्णालयाचा देखील समावेश आहे. 250 रुपये शुल्क आकारून ही लस देण्यात येत आहे. शासकीय केंद्रात ही लस निशुल्क आहे. मात्र, त्यासाठी बराच वेळ ताटकळत उभे राहावे लागते. जे सधन लोक आहेत ते खासगी केंद्रात जाऊन लस घेत आहेत. मात्र, असेही काही लोक आहेत जे अत्यंत गरीब आहेत. मात्र, त्यांना लस घ्यायची असते. अशा लोकांकडून नाममात्र फी घेऊन डॉ. मुसळे लसीकरण करत आहेत. शासनाच्या निर्देशानुसार 250 रुपयामागे 150 रुपये हे शासनाला जातात तर त्यावर शंभर रुपये हे संबंधित खासगी लसीकरण केंद्राला मिळतात. त्यातही या लसीला सुरक्षित ठेवण्यासाठी त्याचे तापमान कायम ठेवावे लागते. त्यासाठी वेगळा स्टाफ उपलब्ध करून द्यावा लागतो. त्यासाठी वेगवेगळे कक्ष स्थापन करावे लागतात. ज्याची भरपाई म्हणून हे शंभर रुपये दिले जातात. मात्र, डॉ. मुसळे यांनी अनेक गरजू लोकांना केवळ 150 रुपयांत ही लस दिली आहे. त्यातही अत्यंत गरीब लोक आहेत त्यांना ही लस मोफत देण्यात आली आहे.
महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य योजनेचा रुग्णांना लाभ