चंद्रपूर -मागील सहा वर्षांपासून दारूबंदी असलेल्या चंद्रपूर जिल्ह्याची दारूबंदी अखेर हटविण्यात आली. त्यानुसार बंद असलेल्या दारूची दुकाने आणि बार रेस्टॉरंटच्या परवान्यांचे नूतनीकरण करण्याच्या सूचना जाहीर झाल्या आहेत. याची सुरूवात कधी होते याची उत्सुकता दारूच्या आस्थापना मालकांना होती. अखेर आजपासून (गुरूवारी) ही प्रक्रिया सुरू झाली असून जिल्हा उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयात दुकानांच्या मालकांनी हजेरी लावली. ही प्रक्रिया एक खिडकी पद्धतीने सुरू करण्यात आली असून ज्यांच्याकडे आवश्यक कागदपत्रे आहेत, त्यांना नूतनीकरण करण्याचा फॉर्म देण्यात आला.
दारू दुकानांच्या परवाना नुतनीकरण अशी पार पडली प्रक्रिया
चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी सरकारने उठविण्याचा निर्णय घेतला. त्याची दुसरी पायरी म्हणून उत्पादन शुल्क विभागाला दारूच्या दुकानांचे तसेच बार अँड रेस्टॉरंटच्या परवाना नूतनीकरणाचे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार आज (गुरूवारी) आपल्या परवान्यांचे नूतनीकरण करण्यासाठी मालकांनी कार्यालयात धाव घेतली. कोरोनाच्या काळात गर्दी उसळू नये यासाठी वरोरा, राजुरा आणि चंद्रपूर अशा तीन ठिकाणी ही प्रक्रिया सुरू होणार होती. मात्र, राजुरा येथील कार्यालयात काही तांत्रिक अडचण आल्याने राजुरा येथील ही व्यवस्था चंद्रपुरात करण्यात आली. अनेकांना वाटले की उत्पादन शुल्क भरला की लगेच आपल्या परवान्यांचे नूतनीकरण होऊन जाईल. मात्र, उत्पादन शुल्क विभागाने ज्यांच्या सर्व प्रक्रिया यापूर्वी झाल्या आहेत, त्यांच्याकडे आवश्यक कागदपत्रे आहेत अशाचीच प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे अनेकांच्या पदरी निराशाच लागली आहे. परवानगी मिळाली अशाची पाहणी जिल्हा उत्पादन शुल्क विभाग करणार आहेत. यानंतरच दुकाने सुरू करण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
हेही वाचा -एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मांना NIA ने केली अटक, मनसुख हिरेन खुनाचे पुरावे नष्ट केल्याचा आरोप