चंद्रपूर : राईस मिल येथील तारांच्या कुंपणात अडकून बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना आज उजेडास आली. ही घटना नागभीड वनपरिक्षेत्रातील बागल (मेंढा) या गावात घडली. मृत बिबट्याला उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे.
नागभीड परिक्षेत्रातील मिंडाळा बिट नजीक बागल (मेंढा) येथील सदगुरु कृपा राईस मिलच्या परिसरात तारेचे कुंपण करून आहे. आज येथे बिबट्या मृतावस्थेत आढळून आला. मिलमालक विलास गिरीपुंजे यांना ही बाब लक्षात येताच त्यांनी वनविभागाला माहिती दिली. लागलीच वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.
घटनास्थळापासून काही अंतरावर डुक्करसुद्धा मृतावस्थेत आढळले. त्यामुळे सुरुवातीला बिबट्याने डुकरावर हल्ला करून ठार केले. नंतर डुकराच्या कळपाच्या हल्यात आपला जीव वाचविण्यासाठी जात असताना कुंपणात बिबट्याचे दोन्ही पाय अडकले त्यामुळे त्याला बाहेर पडता न आल्याने मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. सदर बिबट हा एक ते दीड वर्षाच्या असून मादी आहे.