चंद्रपूर- भक्षाच्या शोधात असलेला एक बिबट्या थेट घरात घुसल्याची घटना बल्लारपूर तालुक्यातील इटोली या गावात घडली. या घटनेने ग्रामस्थांची चांगलीच भंबेरी उडाली होती. त्यानतंर वन विभागाच्या प्रयत्नांनी या बिबट्याला जंगलाच्या दिशेने पळवून लावण्यात यश आले आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
थरारक..! चंद्रपुरात बिबट्या थेट शिरला घरात, वनविभागाने केली सुटका - Lata Gopal Devtale
लता गोपाल देवतळे यांच्या घरात बिबट्या घुसला. ही बाब लक्षात येताच त्यांनी प्रसंगावधान दाखवत घराच्या बाहेरून दरवाजा लावला. या घटनेची माहिती वन विभागाला मिळताच वन परिक्षेत्र अधिकारी संतोष थिपे, क्षेत्र सहायक प्रविण विरुटकर हे घटनास्थळी पोहोचले व बिबट्याला पिळवून लावले.
चंद्रपूर जिल्हा हा जंगलाने व्यापलेला असल्याने येथे जंगली प्राण्यांचा मुक्त संचार आहे. त्यामुळे अनेकदा मानव-वन्यजीवांचा संघर्षही पाहायला मिळतो. असाच एक प्रकार शुक्रवारी बल्लारपूर वन परिक्षेत्रातील इटोली या गावात घडला. लता गोपाल देवतळे यांच्या घरात बिबट्या घुसला. ही बाब लक्षात येताच लता देवतळे यांनी प्रसंगावधान दाखवत घराच्या बाहेरून दरवाजा लावला. घरात बिबट्या घुसल्याची माहिती मिळताच ग्रामस्थांनी बिबट्याला पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.
या घटनेची माहिती वन विभागाला मिळताच वन परिक्षेत्र अधिकारी संतोष थिपे, क्षेत्र सहायक प्रवीण विरुटकर हे घटनास्थळी पोहोचले. त्यांनी लोकांचा जमाव बाजूला सारला. त्यानंतर त्यांनी बिबट्याची सुटका करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. तसेच या घटनेत बिबट्या कोणाला दुखापत करणार नाही, याचीही काळजी त्यांनी यावेळी घेतली. तो बिबट्या गावात इतरत्र जाऊ नये यासाठी जाळी लावण्यात आली. अखेर शर्थीच्या प्रयत्नानंतर बिबट्याला जंगलाच्या दिशेने पळवून लावण्यात वनविभागाला यश आले.