चंद्रपूर Durgadevi Idol In Chandrapur : चंद्रपूर शहराला गोंड साम्राज्याचा ऐतिहासिक वारसा आहे. संपूर्ण शहर ऐतिहासिक गोंडकालीन किल्ल्याने वेढलेलं आहे. त्यामुळे शहरात अनेक ठिकाणी अत्यंत दुर्मीळ असे ऐतिहासिक पुरावे सापडत असतात. अशाच एका ऐतिहासिक मूर्तीमुळं चंद्रपूर शहर चर्चेत आलं आहे. दुर्गादेवीच्या प्राचीन मूर्ती फार दुर्मीळ आहेत. त्यातही दशावतारी मूर्ती ही त्याहून दुर्लभ.
रावण परिसराची पार्श्वभूमी :हा परिसर राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मागे भिवापूर वॉर्डात आहे. जिथे अनेक मूर्ती आहेत. तो परिसर रावण परिसर म्हणून ओळखला जातो. त्यामागची देखील ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. येथे दुर्गादेवीची दशावतारी मूर्ती आहे. ती भग्नावस्थेत असल्याने अनेकांना ती रावणाची मूर्ती असल्याचा समज होता. त्यामुळे हा परिसर रावण परिसर म्हणून परिचित झाला. दसऱ्याच्या दिवशी येथे लोक जमत आणि या मूर्तीला रावण समजून दगड मारत. मात्र, कालांतराने त्यांना हे समजलं की ही मूर्ती रावणाची नसून दुर्गादेवीची आहे आणि यानंतर हे सगळं थांबलं.
तर ते राज्यातील सर्वांत भव्य मंदिर असते :भिवापूर वॉर्डातील रावण परिसरात ज्या ठिकाणी विखुरलेल्या स्वरूपात मूर्ती आहेत तिथं आधी एक भव्य मंदिर होणार होतं. सोळाव्या शतकात चंद्रपूर जिल्ह्यात गोंड राजाचं साम्राज्य होतं. राजा धुंड्या रामशाहा हे त्यावेळी राजे होते. त्यांच्या कार्यकाळात रायप्पा वैश्य हे मोठे धनिक होते. रायप्पा वैश्य हे महादेवाचे खूप मोठे भक्त होते. याच श्रद्धेतून त्यांनी महादेवाचं भव्य मंदिर बांधण्याचे ठरविलं. राज्यातील उत्तम शिल्पकारांकडून मंदिरासाठी सुंदर मूर्ती आकारास येऊ लागल्या. दशमुखी दुर्गा, महिषासुरमर्दिनी, मत्स्यावतार, कुर्मअवतार, शिवलिंग, नंदी, हनुमान, गणेश, कालभैरव, शेषनाग व गरुड अशा अनेक सुंदर मूर्तीचं काम पूर्णत्वास गेलं; पण रायप्पांचे आकस्मिक निधन झाले आणि त्यांच्या कुटुंबातील कुणीही या कार्यात रस घेतला नाही आणि काम थांबलं. यानंतर पुढे कोणीही मंदिरासाठी प्रयत्न केले नाहीत. त्यामुळे या भव्य मूर्ती आजही शहरातील भिवापूर वॉर्डातील आकाशाच्या मांडवाखाली पडून आहेत.