चंद्रपूर - राज्याच्या एका टोकापासून ते दुसऱ्या टोकापर्यंत चंद्रपूरच्या मजुराने तब्बल 800 किमी अंतर पायी कापून घर गाठल्याची थक्क करणारी माहिती समोर आली आहे. लॉकडाऊन दरम्यान सर्व वाहतूक व्यवस्था बंद असल्यामुळे मजुराने पनवेल ते चंद्रपूर असा 14 दिवसांचा अंगावर काटा येईल, असा प्रवास केला आहे.
चंद्रपूरच्या मजुराने तब्बल 800 किमी अंतर केवळ बिस्किटे खाऊन गाठले - chandrapur corona update
अजय सातोरकर हा मूळचा चंद्रपुरातील पठाणपुरा येथील रहिवासी आहे. रायगड जिल्ह्यातील पनवेल येथे तो मजुरी करायचा. मात्र, टाळेबंदी झाली. त्याच्याकडे असलेल्या 5 हजार रुपयांवर त्याने दिवस काढायला सुरुवात केली. तेही पैसी संपले आणि त्याने घरी परतण्याचा निर्णय घेतला.

एका दुचाकीस्वाराने चाळीस किलोमीटरपर्यंत सोडून दिले. ४ एप्रिलला अहमदनगर गाठले. एका दुकानाशेजारी बिस्कीटपुडा खाऊन रात्र काढली. ५ एप्रिलला औरंगाबाद गाठले. त्यानंतर ६ ते १४ एप्रिल दरम्यान जालना, शेंदूरजना घाट, मेहकर, मालेगाव, वाशिम, पुसद, दिग्रस, उमरी असा त्याने पायदळ प्रवास केला. मिळेल त्याठिकाणी खायचे. उघड्यावरच झोपायचे. नाकेबंदी असल्याने मुख्यमार्ग चुकविण्यासाठी आडमार्गाचा आसरा घ्यायचा. वाटेत नदीत अंघोळ करायची. १५ एप्रिलला तो रात्री साडेदहा वाजता वणी येथे पोहोचला. एका हॉटेलशेजारी रात्री काढली. आता जिल्ह्याच्या सीमेत प्रवास करण्यासाठी काहीच तास शिल्लक होते. घरी पोहोचणार यामुळे तोही आनंदी होता. त्यामुळे आज १६ एप्रिलला अजय पहाट साडे पाच वाजता वणी येथून पायी निघाला. बिस्कीट खाऊनच बहुतांश त्याचा प्रवास झाला होता. यावेळीही त्याने बिस्कीट घेतले.
वर्धा नदी घुग्घुस येथे सकाळी ११ वाजून ४५ मिनीटांनी पोहोचला. तत्पूर्वी, त्याने मित्राशी भ्रमणध्वनीवर संपर्क केला होता. मित्राने पोलिसांना माहिती दिली आणि त्याला नदीवरच ताब्यात घेतले. जिल्ह्यात बंदी असताना दुसऱ्या जिल्ह्यात वास्तव्यास असलेल्यांना परवानगीशिवाय येता येत नाही. त्याला घुग्घुस येथील रुग्णालयात आणले आणि चंद्रपूरला विलगीकरण कक्षात हलविण्याची तयारी सुरू केली. मात्र, अजयच्या जिद्दीला पोलिसांनीही सलाम केला. आठशे किलोमीटरचा प्रवास त्याने पायदळ चालून पूर्ण केला. रोज सरासरी १२५ किलोमीटर अंतर तो कापायचा. या प्रवासात तो एकटाच होता. त्याचा हा प्रवास अंगावर काटा आणणारा आहे.