चंद्रपूर - ताडोबाचे प्रवेशद्वार असलेल्या पद्मापुर येथील तपासणी नाक्यावर झडती दरम्यान दुचाकी स्वाराकडे वाघाच्या मिशा आढळून आल्या. ही गंभीर घटना लक्षात येताच दुचाकीवरील दोन जणांना वनविभागाने ताब्यात घेतले. यानंतर करंट लागलेल्या तारामुळे वाघाचा मृत्यू झाला आणि त्याला शेतात पुरले, अशी कबुली आरोपींनी दिली.
चंद्रपूर : वाघाला मारून शेतात पुरले, मिशा नेताना बिंग फुटले
ताडोबा जंगलामधील एका वाघाच्या मृत्यूनंतर त्याला जमिनीत गाडून त्याच्या मिशा पळवणाऱ्या गुन्हेगारांना पकडण्यात आले आहे. यानंतर करंट लागलेल्या तारामुळे वाघाचा मृत्यू झाला आणि त्याला शेतात पुरले अशी कबुली आरोपींनी दिली.
मोहर्ली वनपरिक्षेत्राअंतर्गत येणाऱ्या पद्मापूर तपासणी नाक्यावर वाहनांची आणि व्यक्तीची तपासणी करण्यात येत असते. या तपासणी नाक्यावर शुक्रवारला मोहर्लीवरून येणारी एका दुचाकी (एमएच 34 AN 0728) आली. या दुचाकीवर मुधोली येथील नरेंद्र विठ्ठल चौधरी व भामडेळी येथील मनोज विठ्ठल शेंडे हे दोघे स्वार होते. ही गाडी थांबवून तपासणी करण्यात आली. तपासणीमध्ये त्यांच्याजवळ वाघाच्या १२ नग मिशा आढळून आल्या.
या घटनेची माहिती लगेच वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आली. दोघांना चौकशीकरिता ताब्यात घेण्यात आले. पुढील तपासामध्ये आणखी दोन व्यक्तींची नावे समोर आली. मुधोली येथील सुभाष गोवर्धन पेंदलवार आणि कैलास भाऊराव दडमल यांनाही चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. वाघाच्या मिशा या आरोपींकडून सापडल्याने त्यांनी वाघाची शिकार केली असे निष्पन्न झाले. मुधोली येथील बंडू श्रीरामे याच्या शेतात विजेचे तार लावण्यात आले. यात एका वाघाचा मृत्यू झाला. त्याचे वय हे चार पाच वर्षांचे होते. त्याच्या मृत्यूनंतर त्याच शेतात वाघाचे प्रेत पूरण्यात आले. कैलाश दडमल याने जमिनीत वाघाला पुरण्यापूर्वी त्याची नखं आणि केस काढले होते. यानंतर वनविभागाने ह्याचे उत्खनन करून वाघाचा सर्व सांगाडा, हाडे जप्त केली. कारवाई करतेवेळी सहाय्यक वनसंरक्षक येडे, वनपरिक्षेत्राधिकारी राघवेंद्र मुन, वनपाल धर्मेंद्र राऊत, भूषण गजापुरे, देऊरकर, माहातव यांनी ही कारवाई केली.