चंद्रपूर - आपल्या अस्सल वैदर्भीय बोलीभाषेतून स्पर्धा परीक्षेचे धडे देणारे नितेश कराळे गुरूजी हे आता महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचले आहेत. त्यांच्या प्रत्येक व्हिडिओवर लाइक्सचा पाऊस पडत आहे. याच प्रसिद्धीच्या जोरावर ते नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी उभे ठाकले आहेत. त्यांनी अचानक राजकारणात येण्याचा निर्णय का घेतला, याबाबत अनेकांना प्रश्न पडला आहे. दरम्यान, चंद्रपूरच्या दौऱ्यावर असताना कराळे यांनी ईटीव्ही भारतशी संवाद साधत या प्रश्नाचे उत्तर दिले.
कोरोना काळात शिकवणी वर्ग बंद होते, म्हणून वर्धा जिल्ह्यातील नितेश कराळे यांनी ऑनलाइन पद्धतीने स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन देण्याचे ठरवले. अनेक क्लिष्ट विषय सहज आणि सोप्या पद्धतीने मांडण्याच्या कलेत त्यांचा हातखंडा आहे. त्यावर अस्सल वऱ्हाडी भाषेची फोडणी. त्यामुळे, लॉकडाऊनच्या काळात कराळे गुरुजींचा व्हिडिओ तुफान व्हायरल झाला होता. यानंतरच्या व्हिडिओंना लाखोंच्या घरात लाइक्स यायला लागले.
...म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला
प्रमाणित भाषेची सर्व बंधने तोडून फेसबुक, व्हॉट्सअॅप, यूट्यूबच्या माध्यमातून कराळे गुरूजी महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचले. ते स्टार झाले. याच दरम्यान नागपूर पदवीधर मतदारसंघाची निवडणूक झाहीर झाली. कोणीतरी कराळे गुरूजींच्या फोटोसह ते पदवीधर मतदार संघाचे उमेदवार म्हणून पोस्ट व्हायरल केली. यानंतर कराळे गुरूजींचे फोन खनखनू लागले. अनेकांनी या गोष्टीचे स्वागत केले, त्यांचे अभिनंदन केले. मात्र, कराळे गुरूजींनी आपण कुठलीही निवडणूक लढत नसून कोणीतरी ही पोस्ट व्हायरल केल्याचे स्पष्ट केले. मात्र, कराळे यांनी ही निवडणूक लढवावी, असा नागरिकांनी आग्रह धरला.