चंद्रपूर - आनंदवनातील महारोगी सेवा समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शीतल आमटे-करजगी यांच्या आत्महत्येनंतर करजगी कुटुंबाने आमटे कुटुंबाला पत्र लिहून काही गंभीर आरोप केले आहेत. हे पत्र शीतल आमटे यांच्या सासू सुहासिनी करजगी आणि सासरे शिरीष करजगी यांनी शीतल आमटे यांच्या मृत्यूपूर्वी लिहिले होते. ते फेसबुकवर देखील टाकण्यात आले होते. आमटे कुटुंबाने ज्या पद्धतीने शीतल यांना वागणूक दिली, जो त्रास दिला, त्यामुळेच शीतलने आत्महत्या केल्याचा गंभीर आरोप या पत्राद्वारे करण्यात आला आहे. शीतल आमटे आणि त्यांचे पती गौतम करजगी यांनी आनंदवनात उत्तम काम केले. मात्र मुलगी म्हणून तिच्याबाबत दुजाभाव करण्यात आला. सोबत आमटे कुटुंबातील सदस्यांना देखील यात अनेक प्रश्न विचारण्यात आले आहेत.
करजगी कुटुंबाचे पत्र
अनेक पेपरमधे शीतलच्या मानसिक आजाराबद्दल बातमी वाचली. खूप वाईट वाटले व आश्चर्य पण वाटले. यावर काही प्रतिक्रिया द्यावी, की चूप रहावे हे कळत नव्हते. परंतु, शेवटी विचार केला की शीतल 'आमटे' असून तिच्या बाबतीत जर असा अन्याय होतो आहे, तर बाकी सामान्य मुलींचे काय होत असेल? आमटे कुटुंबांनी (तिच्या स्वतःच्या आई- वडिलांनी व काका- काकूंनी) तिच्याबद्दल असे संयुक्त निवेदन(स्वाक्षरी करून) द्यावे, यासारखी लाजीरवाणी गोष्ट आणखीन काय असू शकते?
ज्या दिवशी 'गौतम-शीतल'चे लग्न झाले. त्यादिवशीपासून शीतलला मी माझी मुलगीच मानले आणि त्याच हक्काने आज मी आमटे कुटुंबीयांना काही प्रश्न विचारते.
- शीतलने संस्थेच्या कामात खूप योगदान दिले आहे, असं तुम्हीच लिहले आहे. मग जर शीतलला आज काही मानसिक ताण व नैराश्य आहे, तर तिला संभाळणे व आपुलकीने तिला जवळ न घेता, तिच्याशी न बोलता, तिला दूर का लोटले जाते आहे?
- कारण आनंदवनात सगळ्या दिव्यांग लोकांची काळजी घेतली जाते. मग सख्ख्या मुलीबाबत बोभाटा का? की या मागे आमटे कुटुंबाचा काही स्वार्थ आहे?
- डॉ. प्रकाश आमटे यांना तर मुक्या प्राण्यांची भाषा कळते व ते त्यांच्याशी संवाद पण करतात, मग स्वतःच्या पुतणीशी संवाद का साधता आला नाही? सोशल मीडियावर बदनामी करण्याची गरज काय?
- कौस्तुभ आमटे यास परत विश्वस्थ मंडळावर घेतले. त्याबाबत मला विचारावेसे वाटते की, त्याला काढले का होते? खास गोष्ट म्हणजे ज्या सगळ्या ट्रस्टींनी त्याला काढले, त्यांनीच त्याला परत घेतले. तर आमचासारख्या असंख्य लोकांना हे विचारावेसे वाटते की, त्याला ट्रस्टी म्हणून काढण्यामागचे कारण काय होते? व आता परत घेतले तर त्यांनी अशी काय विशेष कामगिरी केली?
- मागचा 4-5 वर्षांपासून तर कौस्तुभ आमटेचे नाव पण कुठे वाचण्यात आले नाही. इतके वर्ष तो होता कुठे? की आमटे कुटुंब पण सर्व सामान्य माणसांप्रमाणे मुलगा (घराण्याचा वारस) आणि मुलीमधे फरक करतात?
- आज मी सर्वांना खुले आव्हान करते की, आनंदवनला जावे व शीतल आणि गौतमने जे काम केले आहे. ते स्वतःच्या डोळ्यांनी बघावे आणि मग काय ते ठरवावे. आमटेंसारख्या नावाजलेल्या लोकांनी पण मुला-मुलींमधे फरक करावा, ही खरंच लाजीरवाणी गोष्ट आहे. नाही का?
उंची न अपुली वाढते फारशी वाटून हेवा।
श्रेय ज्याचे त्यास द्यावे, एवढे लक्षांत ठेवा।
ती पूर्वजांची थोरवी त्या पूर्वजांना गौरवी।
ती न कामी आपुल्या, एवढे लक्षांत ठेवा।