चंद्रपूर - भद्रावती, वरोरा तालुक्यात वाळू तस्करीसाठी कुख्यात असलेल्या वासुदेव ठाकरेला अखेर भद्रावती पोलिसांनी अटक केली. त्याच्यावर 350 ब्रास वाळूचोरी केल्याचा आरोप आहे. मात्र, प्रत्यक्षात त्याने हजारो ब्रास वाळूची तस्करी करून शासनाचा महसूल बुडवला आहे. त्यामुळे थातूरमातूर कारवाई न करता, ही गंभीर बाब लक्षात घेऊन त्यादृष्टीने सखोल तपास करावा, अशी मागणी कामगार सेनेचे बंडू हजारे, कैलाश तेलतुंबडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देण्यात आले आहे.
'त्या' वाळूतस्कराच्या हजारो ब्रास वाळूचोरीची चौकशी करा; कामगार सेनेची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी - चंद्रपूर जिल्ह्यात वाळू तस्करांचा उच्छाद
चंद्रपूर जिल्ह्यातील वासुदेव ठाकरे याने भद्रावती आणि वरोरा तालुक्यात वाळूतस्करी उच्छाद मांडला आहे. प्रशासनाच्या काही अधिकाऱ्यांशी हातमिळवणी करुन किरकोळ वाळूतस्करांची वाहने पकडून द्यायची, असे करत त्याने आपले वर्चस्व निर्माण केले. त्याच्यावर 350 ब्रास वाळूचोरी केल्याचा आरोप आहे. मात्र, प्रत्यक्षात त्याने हजारो ब्रास वाळूची तस्करी करून शासनाचा महसूल बुडवल्याचा आरोप कामगार सेनेच्या कार्यकर्त्यांनी केला आहे.
वासुदेव ठाकरे याने भद्रावती आणि वरोरा तालुक्यात वाळूतस्करी उच्छाद मांडला आहे. प्रशासनाच्या काही अधिकाऱ्यांशी हातमिळवणी करुन किरकोळ वाळूतस्करांची वाहने पकडून द्यायची, असे करत त्याने आपले वर्चस्व निर्माण केले. त्याला राजकीय वरदहस्त देखील प्राप्त आहे. मग पोकलेन, जेसीबी, हायवा ट्रक अशा अवाढव्य वाहनांनी वाळूचा उपसा करुन त्याची तस्करी केली जाऊ लागली. त्याची वेकोली परिसरात साठवणूक करायची. या संदर्भात प्रशासनाकडे अनेक तक्रारी करुनही काही झाले नाही. अखेर महसूल विभागाकडून भद्रावती पोलिसांना पुरावे देण्यात आले. त्यात तस्करी करणाऱ्या वाहनांसह अन्य तपशील देखील होता. हे प्रकरण 350 ब्रास वाळूची चोरी केल्याचे होते. असे असतानाही पोलिसांनी कारवाई करण्यास विलंब केल्याचा आरोप करण्यात आला होता. अखेर कंत्राटी कर्मचारी सेनेचे जिल्हाध्यक्ष बंडू हजारे आणि शहर अध्यक्ष कैलाश तेलतुंबडे यांनी जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार आणि जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्याकडे तक्रार केली.
सबळ पुरावे असतानाही कारवाई करण्यास कुचराई केली जात असल्याची बाब त्यांना निदर्शनास आणून दिली. यानंतर सूत्रे फिरली आणि वासुदेव ठाकरेसह आणखी तीन जणांना वाळू चोरी प्रकरणी अटक करण्यात आली. सोबत दोन हायवा ट्रकही जप्त करण्यात आले. भादंवी कलम 379 चा गुन्हा यात दाखल करण्यात आला असून आरोपींना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. मात्र हे प्रकरण केवळ 350 ब्रास वाळूचोरीचे आहे. प्रत्यक्षात वासुदेवने हजारो ब्रास वाळू चोरी केल्याचा दावा हजारे यांनी केला आहे. यात शासनाचा कोट्यवधीचा महसूल बुडाला. सोबत पर्यावरणाचीही मोठी हानी झाली. ही बाब अत्यंत गंभीर असून या संदर्भात सखोल तपास व्हायला हवा. थातूरमातूर चौकशी व्हायला नको, अशी मागणी हजारे यांनी केली आहे. त्यामुळे तपास नेमका कोणत्या दिशेने होतो, त्यात काही ठोस आढळते का आणि हजारो ब्रास वाळूचोरीचे घबाड समोर येते का, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.