चंद्रपूर- जिल्ह्यातील वाढती बेरोजगारी आणि कामगारांच्या विविध समस्यांसाठी उलगुलान संघटनेच्यावतीने मोर्चा काढण्यात आला. यावेळी विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांना संघटनेच्या वतीने देण्यात आले.
चंद्रपूर जिल्हा हा औद्योगिक जिल्हा म्हणून ओळखला जातो. मात्र, याच जिल्ह्यात कामगार आणि बेरोजगार यांची स्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. शासन आणि प्रशासन याबाबत प्रचंड उदासीन असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे ह्या समस्या त्वरित मार्गी लावाव्या, यासाठी उलगुलान कामगार संघटनेद्वारा अध्यक्ष राजु झोडे यांच्या नेतृत्वात मोर्चा काढण्यात आला. गांधी चौकापासुन याची सुरुवात करण्यात आली. मोर्चात मोठया संख्येने बेरोजगार आणि कामगार सहभागी झाले होते. उलगुलान कामगार संघटनेचे अध्यक्ष राजु झोडे, राजु काटम, गुरु भगत, अजय तंगुपल्लीवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.