चंद्रपूर - दिल्ली येथे सुरू असलेल्या किसान आंदोलन तर्फे देशव्यापी टोलमुक्ती आंदोलनाची घोषणा करण्यात आलेली होती. या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी चंद्रपुरातील जन विकास सेनेच्यावतीने बल्लारपूर मार्गावरील विसापूर टोल नाका येथे टोलमुक्ती आंदोलन करण्यात आले. संघटनेचे अध्यक्ष आणि मनपा नगरसेवक पप्पू देशमुख यांच्या नेतृत्वात हे आंदोलन पार पडले. यावेळी आंदोलकांनी टोळनाक्यावर जबरदस्तीने वाहने सोडल्याप्रकरणी पोलिसांनी त्यांना अटक करत गुन्हे दाखल करून सोडून दिले.
टोलनाक्यावर आंदोलक आक्रमक-
जनविकास संघटनेचे शेकडो कार्यकर्ते या किसान आंदोलनसाठी वाहनांनी रॅली काढत विसापूरच्या टोलनाक्यावर पोहोचले. त्यानंतर विसापूर टोल नाका येथे आदोलकांनी जड वाहनांसाठी टोलनाका मुक्त केला. यावेळी नाक्यावरील कर्मचाऱ्यांनी आंदोलकांना अटकाव करण्याचा प्रयत्न केला. परंतु आंदोलकांनी बळजबरीने वाहने सोडणे सुरू केले. त्यामुळे पोलिसांना पाचारण करण्यात आले. यानंतर बल्लारपूरचे पोलीस निरीक्षक पुरेशा पोलीस बळासह घटनास्थळी दाखल होत आंदोलनकांना ताब्यात घेतले. तसेच या आंदोलकांना बल्लारपूर पोलीस स्टेशनमध्ये स्थानबद्ध करून कलम 68 नुसार गुन्हा दाखल करून त्यांना सोडण्यात आले.