चंद्रपूर- चंद्रपूर जिल्ह्यात जे आकाशातून ( Chandrapur Satellite Parts ) अवशेष पडले होते, ते उपग्रह पाठविणाऱ्या रॉकेट बूस्टरचे असल्याचे इसरो तज्ज्ञांच्या टीमच्या पाहणीत ( ISRO Team Inspection At Chandrapur ) समोर आले आहे. मात्र, यावर कुठलेही अधिकृत भाष्य करण्यास त्यांनी नकार दिला आहे. जमा करण्यात आलेले सर्व अवशेष हे बंगलोर येथील इसरो या संशोधन संस्थेत नेण्यात येणार आहे, अशी माहिती आहे.
सहा सिलेंडर्स आणि रिंगची इसरोकडून पाहणी -आज दुपारी 12 वाजता इसरो या बेंगलोर स्थित अवकाश संस्थेचे दोन वैज्ञानिक एम. शाहजहान आणि मयुरेश शेट्टी हे सिंदेवाही येथे 2 एप्रिल ला सिंदेवाही परिसरात पडलेल्या सॅटेलाईट रॉकेट बूस्टरचे अवशेष पाहण्यासाठी आले होते. स्काय वाच ग्रुपचे अध्यक्ष प्रा. सुरेश चोपणे हे त्यांचे सोबत माहिती देण्यासाठी उपस्थित होते. त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये ठेवलेल्या सहा सिलेंडर्स आणि रिंगची पाहणी केली. फोटो आणि व्हिडीओ घेतले आणि लाडबोरी गावातील लोकांशी चर्चा केली. चोपणे यांना दिलेल्या माहिती नुसार हे अवशेष सॅटेलाईट रॉकेट बूस्टरचे असल्याचे त्यांनी सांगीतले. परंतु या सिलेंडरमध्ये कोणते इंधन होते, ते प्रयोगशाळेच्या तपासणी नंतर सांगता येईल, असे सांगितले. हे अवशेष इसरोच्या कंटेनरमध्ये आजच नेले जाईल. हे अवशेष कुण्या देशाचे आहे, कुणाची जबाबदारी आहे हे सांगण्यास त्यांनी नकार दिला. ही अतिशय गोपनीय माहिती असून एका आठवड्यात यावर संशोधन करून निर्णय दिल्या जाईल, असे त्यांनी स्काय वाच ग्रुपचे अध्यक्ष प्रा. सुरेश चोपणे यांना सांगितले आहे.