महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Sep 26, 2021, 9:44 AM IST

ETV Bharat / state

चंद्रपूर: आयपीएल सट्टाबाजार पुन्हा जोमात; गडचिरोली पोलिसांनी जमलं ते चंद्रपूर पोलिसांना का नाही?

जिल्ह्यातील सट्टाबाजाराचे रॅकेट अजूनही जोमाने सक्रिय आहे. अनेक लोक यात सक्रिय झाले असून या क्षेत्रातील विश्वसनीय सूत्रांनुसार या रॅकेटच्या माध्यमातून दररोज कोटींचा सट्टा खेळला जात आहे.

chandrapur IPL betting
chandrapur IPL betting

चंद्रपूर -आयपीएल आणि विविध खेळांवर जुगार लावणाऱ्या चंद्रपूरातील एक मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश गडचिरोली पोलिसांनी केला आहे. या प्रकरणात अनेकांना अटक करण्यात आली. असे असताना चंद्रपूर पोलिसांनी यावर कारवाई करण्यासाठी अद्याप कुठलीही मोहीम हाती घेतली नाही. या कारवाईच्या अभावी हे रॅकेट जिल्ह्यात चांगलेच फोफावले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सट्टाबाजाराचे रॅकेट अजूनही जोमाने सक्रिय आहे. अनेक लोक यात सक्रिय झाले असून या क्षेत्रातील विश्वसनीय सूत्रांनुसार या रॅकेटच्या माध्यमातून दररोज कोटींचा सट्टा खेळला जात आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात क्रिकेटवर सट्टा लावण्याचे एक मोठे रॅकेट सक्रिय होते. मात्र, गडचिरोली पोलिसांनी आष्टी आणि अहेरी येथील असा सट्टा लावणाऱ्या काही आरोपींना ताब्यात घेतले. ज्यात चंद्रपूर येथून सक्रिय असणाऱ्या सट्टेबाजार रॅकेटचा पर्दाफाश झाला. अशावेळी जिल्ह्यातील हे रॅकेट उध्वस्त करणे चंद्रपूर पोलिसांना सहज शक्य होते. अशावेळी जिल्ह्यातील अशा सक्रिय रॅकेटवर कारवाईचा बडगा का उभारल्या जात नाही, यावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

काय आहे नेमके प्रकरण -

आयपीएल म्हणजे सट्टा लावण्याचे एक मोठे केंद्र झाले आहे. यावर जुगार लावणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असून दररोज यावर कोटींचा जुगार खेळला जातो. जुलै महिन्यात ऑलम्पिक खेळावर जुगार लावण्यात येत आहे, अशी गुप्त माहिती गडचिरोली पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार जुलै महिन्याच्या शेवटी आष्टी येथील छगन मठले, राजू धर्माडी, मनोज अडेट्वार, द्राव्यराव चांदेकर, सुमित नगराळे आणि अहेरी-आलापल्ली परिसरातील सुरेंद्र शेळके, संदिप गुदप्पवार यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांची चौकशी केली असता या रॅकेटची तारे चंद्रपुरापर्यंत गेली. त्यानुसार ऑगस्ट महिन्यात गडचिरोली पोलिसांनीचंद्रपूर येथील राकेश कोंडावार, रजीक अब्दुल खान, महेश अल्लेवार ह्यांना अटक केली. ह्यानंतर आणखी मोठ्या संख्येने आरोपीची धरपकड झाली. यात इम्रान पठाण (आलापल्ली), राकेश जेल्लेवार (आलापल्ली), रामू अग्रवाल (नागपूर), अंकित हुमने (नागपूर), मनीष तलवानी (नागपूर), वाजीद भाई (तेलंगणा), महेश (सिरोंचा), गणेश (सिरोंचा), संदीप (सिरोंचा), अविनाश (चंद्रपूर), सुधाकर श्रीरामे (चंद्रपूर), महेश सुगत (चंद्रपूर), विशाल पंजाबी (चंद्रपूर), प्रदीप गोगुलवार (चंद्रपूर), राकेश वाघमारे (चंद्रपूर), विजय आहुजा (चंद्रपूर) या सर्व आरोपींना ताब्यात घेण्यात आले. यावेळी एकूण आरोपींची संख्या ही तब्बल 29 पर्यंत गेली होती. यानंतरही गडचिरोली पोलिसांनी अनेकांना चंद्रपुरातून अटक केली.

तरीही चंद्रपुरात सट्टाबाजार जोमाने -

इतकी मोठी कारवाई झाली असताना या रॅकेटला मोठा धक्का बसायला हवा होता. मात्र, चंद्रपूर पोलिसांनी यावर ठोस अशी कुठलीही कारवाई न केल्याने आज चंद्रपुरात सट्टाबाजार जोमात सुरू आहे. सध्या आयपीएल सुरू आहे. त्या माध्यमातून दररोज कोटींच्या घरात सट्टा लावल्या जात आहे. या रॅकेटला नेमका कुणाचा आधार आहे, हे अद्याप न उलगडलेले कोडेच मानले जात आहे.

ही आहे जिल्ह्यातील सक्रिय रॅकेट -

जिल्ह्यात आयपीएल सामन्यांच्या तोंडावर हे रॅकेट पून्हा एकदा सक्रिय झाले आहे. या क्षेत्रात काम करणाऱ्या काही सूत्रांनी नाव न सांगण्याच्या अटीवर यातील काहींच्या नावाची कबुली दिली आहे. यामध्ये चंद्रपुर शहरात आशिष, आसिफ, राजीक, नीरज, धीरज, अविनाश यांच्या नावांची चलती आहे. तर भद्रावतीमध्ये अरविंद आणि राजुरामध्ये भगत या व्यक्तींच्या नावांची चर्चा आहे.

जुगाराचे नागपूर कनेक्शन -

या आयपीएल सट्टाचे तार नागपुरापर्यंत जुळलेले आहेत, अशी खात्रीशीर माहिती आहे. येथील एक म्होरक्या पूर्ण विदर्भातील सूत्रे हलवीत असल्याची माहिती आहे. ज्याचा तपास गडचिरोली पोलीस करीत आहे. या म्होरक्याच्या मागावर पोलीस आहेत. ज्याची काही बँक खातीही गोठविण्यात आलेली आहेत. मात्र, गडचिरोली पोलीस अद्याप या म्होरक्याला अटक करू शकली नाही.

असा चालतो अवैध सट्ट -

betx. co, nice.777.net अशाप्रकारची अनेक बेकायदेशीर वेबसाईट तयार करण्यात येतात ज्याला कुठलीही मान्यता नाही. आशा बेकायदेशिर ऑनलाईन सट्टा प्लॅटफार्मचे युजर आयडी आणि पासवर्डच्या माध्यमातून एजंट / क्लायंट तयार केले जातात. या माध्यमातून दररोज कोटींचा जुगार खेळल्या जातो.

पोलीस अधीक्षकांचा प्रतिसाद नाही -

या याबद्दल पोलीस विभागाची प्रतिक्रिया घेण्यासाठी चंद्रपूरचे जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांच्याशी वारंवार संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी प्रतिसाद दिला नाही. 'गडचिरोली पोलिसांनी चंद्रपुरातून सुरू असणाऱ्या आयपीएल जुगारातील अनेक आरोपींना अटक केली आहे. मात्र, चंद्रपूर पोलिसांनी ह्यावर अद्याप कुठलीही मोहीम राबविलेली नाही. ज्या आरोपींना अटक झाली होती. त्यातील काहींनी पुन्हा आयपीएलवर सट्टा सुरू केला आहे, अशी माहिती मिळत आहे. यावर चंद्रपूर पोलीस काही मोहीम हाती घेणार आहे का? अशांवर काही कारवाई केली जाणार आहे का? असेल तर ही मोहीम कधीपासून सुरू होईल? असा प्रश्न वॉट्सपच्या माध्यमातून विचारण्यात आला. मात्र, त्यावर पोलीस अधकक्षकांनी कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही.

हेही वाचा - अफगाणिस्तानातील परिस्थितीचा वापर कोणत्याही देशाने स्वार्थासाठी करू नये - पंतप्रधान मोदी

ABOUT THE AUTHOR

...view details