चंद्रपुर- लोकसभा काँग्रेसचे उमेदवार बाळू धानोरकर यांच्या चंद्रपुरमधील 'निर्माणाधिन' घरावर आज आयकर विभागाच्या भरारी पथकाने धाड टाकली. या धाडीत आयकर विभागाला काहीच मिळाले नाही. मात्र, या कारवाईवर काँग्रेसचे विधानसभा उपगटनेते विजय वडेट्टीवार यांनी आक्षेप घेतला आहे. भाजपला लोकसभा निवडणूकीत पराभव दिसत असल्याने धानोरकर यांच्या घरावर धाड टाकली असल्याचे वडेट्टीवार यांनी सांगितले.
'भाजपला पराभव दिसत असल्याने, काँग्रेस उमेदवार धानोरकरांच्या घरावर आयकर विभागाची धाड' - विजय वडेट्टीवार
लोकसभा काँग्रेसचे उमेदवार बाळू धानोरकर यांच्या चंद्रपुरमधील 'निर्माणाधिन' घरावर आज आयकर विभागाच्या भरारी पथकाने धाड टाकली.
आपण याबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याचे वडेट्टीवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे. लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातील प्रचार तोफा मंगळवारी थंडावल्या, तर उद्या गुरुवार मतदान होणार आहे. आज दुपारच्या सुमारास आयकर विभागाच्या पथकाने काँग्रेसचे उमेदवार बाळू धानोरकर यांच्या एलटीव्ही शाळेसमोरील घरी धाड टाकली. जवळपास पथकाने दीड तास घराची कसून तपासणी केली. यावर काँग्रेसने तीव्र आक्षेप घेतला आहे. याबाबत विधानसभेचे उपगटनेते विजय वडेट्टीवार यांनी आज पत्रकार परिषद घेतली.
पराभवाच्या भीतीने भाजपच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळे जाणीवपूर्वक ही कारवाई करण्यात आली आहे. ज्याने आयकर विभागाला ही खोटी सूचना दिली, त्याच्यावर कारवाई करावी. तसेच या संपूर्ण कारवाईची चौकशी करण्यात यावी. अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली आहे. याबाबत आपण राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याचेही ते म्हणाले.