महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कुंपणच खातंय शेत? ताडोबात गौण खनिजाचे अवैध उत्खनन, पर्यावरणाची मोठी हानी

ता़डोबा परिसरात गौण खनिजाचे अवैधरित्या उत्खनन करून पर्यावरणाला मोठी हानी पोहोचविण्यात येत आहे. ताडोबात सुरू असलेल्या बांधकामासाठी कंत्राटदाराकडून गौण खनिज वापरले जात आहे. सुरक्षित समजल्या जाणाऱ्या ताडोबातील बफर क्षेत्रात येणाऱ्या आगरझरी येथे हा प्रकार सर्रासपणे सुरू असतानाही जबाबदार अधिकाऱ्यांकडून कुठलीही कारवाई करण्यात आली नाही

TADOBA FOREST
ताडोबात गौण खनिजाचे अवैध उत्खनन, पर्यावरणाची मोठी हानी

By

Published : Jan 10, 2021, 10:43 AM IST

Updated : Jan 10, 2021, 11:42 AM IST

चंद्रपूर - वाघांचे संरक्षण आणि संवर्धनासाठी ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्प हा जगप्रसिद्ध आहे. मात्र याच परिसरात गौण खनिजाचे अवैधरित्या उत्खनन करून पर्यावरणाला मोठी हानी पोहोचविण्यात येत असल्याचा प्रकार समोर आला आहे. धक्कादायक म्हणजे याचा उपयोग ताडोबात सुरू असलेल्या बांधकामासाठी कंत्राटदाराकडून केला जात आहे. सुरक्षित समजल्या जाणाऱ्या ताडोबातील बफर क्षेत्रात येणाऱ्या आगरझरी येथे हा प्रकार सर्रासपणे सुरू असतानाही जबाबदार अधिकाऱ्यांकडून कुठलीही कारवाई करण्यात आली नाही. अधिकाऱ्यांच्या मर्जीशिवाय इतके मोठे उत्खनन करणे शक्य नाही. त्यामुळे स्थानिक अधिकाऱ्यांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. वरीष्ठ अधिकाऱ्यांनी याची दखल घेऊन चौकशी केली तर ताडोबात सुरू असलेल्या अवैध उत्खननाचे मोठे घबाड समोर येऊ शकते.

ताडोबात गौण खनिजाचे अवैध उत्खनन, पर्यावरणाची मोठी हानी
गौन खनिजाचे उत्खनन अहोरात्र-मोहुर्लीकडे जाणाऱ्या ताडोबा व्याघ्रप्रकल्पाच्या प्रवेशद्वारापासून अवघ्या 100 मीटर अंतरावर इमारतींचे बांधकाम करण्यात आले. याचे कंत्राट रामदास पुरुषोत्तम कडेल या व्यक्तीला देण्यात आले. वनकर्मचाऱ्यांना निवासी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी याचे बांधकाम करण्यात आले. या इमारतीकडे जाणारा रस्ता हा मुरूम टाकून तयार करण्यात आला. यासाठी ताडोबातील बफर क्षेत्रात येणाऱ्या आगरझरी या गावाच्या बाजूला उत्खनन करण्यात आले. जेसीबीच्या मदतीने तब्बल 20 ते 25 फुटांचे खोल खड्डे खोदून यातील मुरूम काढण्याचे काम अहोरात्र सुरू होते. ट्रॅक आणि इतर अवजड वाहनांचा उपयोग करून येथील मुरूम इमारतीकडे जाणाऱ्या रस्त्यावर टाकण्यात आला. याचे उत्खनन इतके बेछूट करण्यात आले की सागवानांच्या मोठ्या वृक्षांच्या सभोवतालची सर्व जागा मुळासकट खोदण्यात आली. हे वृक्ष शोभेच्या वस्तूप्रमाणे उभी आहेत. ते कधीही कोलमडू शकतात. हे सर्व होत असताना या क्षेत्रात कार्यरत अधिकाऱ्यांनी याकडे सपशेल दुर्लक्ष केले. अन्यथा इतके दिवस हे उत्खनन सुरू असणे शक्य नाही.

अधिकाऱ्यांची अलिखित परवानगी?

या अवैध उत्खननात कंत्राटदारासह काही अधिकारी देखील सामील आहेत. त्यात भ्रष्टाचार झाल्याचाही आरोप होत आहे. कारण ताडोबात कामाचे कंत्राट मिळाले म्हणून कंत्राटदारांना येथील येथील संपत्ती वापरण्याचा सूट मिळते असे नाही. संबंधित कंत्राटदाराला कामासाठी आवश्यक सर्व साहित्य हे स्वतः पुरवावे लागते. त्याचा सर्व तपशील नियमानुसार सादर करावा लागतो, तरच त्याच्या कामाचे पैसे दिले जाते. अशी सूट असती तर ताडोबातील सागवान, बांबू, वाळू, मुरूम तसेच इतर गौण खनिज आणि पर्यावरणाचा मोठा ह्रास झाला असता. मात्र काही अधिकाऱ्यांनी याला अलिखित परवानगीच दिली आहे, असे दिसून येत आहे.

ताडोबातील संपत्तीचा वापर कंत्राटदाराला करू द्यायचा, त्याचे खोटे बिल तयार करायचे आणि त्यातून आपला वाटा घ्यायचा, अशी ही यंत्रणा आहे. आगरझरी येथे झालेले अवैध उत्खनन हे याच प्रकारात मोडते. हा गंभीर प्रकार काही जबाबदार लोकांच्या समोर आल्याचे भीतीने या उत्खननाचे काम थांबविण्यात आले. पर्यावरणप्रेमी प्रा. डॉ. योगेश दुधपचारे आणि सुरेश चोपणे यांनी देखील या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली. त्यांनी याबाबत चिंता व्यक्त केली असून वरिष्ठांकडे याची तक्रार केली आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकाराची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दखल घेऊन सखोल चौकशी करणे गरजेचे आहे.

शिवसेनेने आणला प्रकार उजेडात-

हा संपूर्ण प्रकार शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी समोर आणला. याबाबत कंत्राटी सेनेचे जिल्हाप्रमुख बंडू हजारे, जिल्हा कार्याध्यक्ष कैलाश तेलतुंबडे, जिल्हा सहसचिव अमोल मेश्राम आणि तालुका उपप्रमुख पप्पी यादव यांनी ताडोबा प्रकल्पाचे क्षेत्र संचालक जितेंद्र रामगावकर यांची भेट घेऊन हा प्रकार निदर्शनास आणून दिला. यावेळी रामगावकर यांनी असा प्रकार होत असेल तर तो गैर आहे. याची माहिती घेण्याचे आश्वासन दिले. तर सेनेने चौकशी करण्याची मागणी केली. अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला.

बफर क्षेत्रात उत्खनन करण्याची मुभा : वनपरिक्षेत्र अधिकारी मुन-

याबाबत वनपरिक्षेत्र अधिकारी मुन यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी बफर क्षेत्रात उत्खनन करण्याची मुभा आहे. हे उत्खनन अवैध नसून वैध असल्याचे स्पष्ट केले. याचे सर्व कागदपत्रे आपल्या कार्यालयात उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे या प्रकाराची मुन यांना आधीच माहिती होती हे स्पष्ट झाले आहे.

वन्यजीव, मनुष्यहानी झाल्यास जबाबदार कोण?

ज्या ठिकाणी हे उत्खनन करण्यात आले त्यापासून ताडोबाचा बफर झोन हा अवघ्या तीन किलोमीटर अंतरावर आहे. त्यामुळे वन्यजीवांचा या ठिकाणी मोठा वावर आहे. सोबतच गावाला लागून उत्खनन केले असल्याने येथे लहान मुले देखील खेळत असतात. अशावेळी कोणी या 20 फुटांच्या खड्ड्यात पडले तर मोठी हानी होऊ शकते. जीवितहानी होण्याची शक्यता देखील नाकारता येऊ शकत नाही. त्यामुळे भविष्यात अशी घटना घडली तर त्याला जबाबदार कोण? हा प्रश्न देखील या माध्यमातून निर्माण झाला आहे.

Last Updated : Jan 10, 2021, 11:42 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details