चंद्रपूर - राज्य उत्पादन शुल्क विभागाने, मागील दोन दिवसात तीन कारवाया करत ९ लाखांचा दारूसाठा जप्त केला आहे. या कारवाईमध्ये दोन कार आणि एक दुचाकीही जप्त करण्यात आली आहे. मात्र यातील एकाही कारवाईत, आरोपींना पकडण्यात विभागाच्या पथकाला यश आले नाही. अज्ञात आरोपींविरोधात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिल्ह्यात दारूबंदीला आता पाच वर्षे पूर्ण झाली आहेत. मात्र, दारूची मागणी आणि पुरवठा अद्यापही कायम आहे. वेळेनुसार ती आणखी अधिक सुनियोजित आणि व्यापक होत आहे. आता तर जिल्ह्यात दारु माफियांच्या बैठकासुद्धा आयोजित केल्या जात असल्याची चर्चा होत आहे. कुठल्या परिसरात कोण व्यवसाय करणार? याचीही रणनिती आखली जात आहे. या एकूण यंत्रणेच्या आत बसणाऱ्या सर्वांच्या मूक संमतीची किंमत ठरवण्यात येत आहे. त्यामुळे अवैध दारू व्यवसायाची व्याप्ती लक्षात घेण्यासारखी आहे. हे मोठे दारू माफिया कोण-कोण आहेत हे दारू बंदीच्या पाच वर्षानेही समोर येऊ शकले नाही. अशात दारू विक्री करणाऱ्यांवर उत्पादन शुल्क विभागाकडून कारवाया होत आहेत. मागील दोन दिवसात या विभागाच्या पथकाने सलग तीन कारवाया केल्या आहेत.
उत्पादन शुल्क विभागाने, २० जून रोजी एका कारमधून (एमएच ३४. के. ६३३४) अवैधरीत्या वाहतूक केली जाणारी दारु, कैलाशनगर येथे पकडली. या कारच्या डिक्कीमध्ये देशी दारूच्या २ हजार ६०० बाटल्या सापडल्या. या घटनेतील आरोपी फरार झाले. २१ जून रोजी आणखी एकामध्ये देशी दारूच्या १ हजार ५०० बाटल्या जप्त करण्यात आल्या. यावेळी देखील आरोपींनी पोबारा केला.
तिसऱ्या कारवाई दुचाकी वाहनावर कारवाई करण्यात आली. यात देशी दारूच्या १०० बाटल्या जप्त करण्यात आल्या. विशेष म्हणजे, या कारवाईत देखील आरोपी पथकाच्या हाती लागू शकले नाही. या तिन्ही कारवाईतील आरोपी फरार असून अज्ञात इसमांवर महाराष्ट्र दारूबंदी कायद्याचे कलम ६५ (अ), (ई) व ८३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.