चंद्रपूर - दुचाकी चालविताना अचानक वीज कोसळल्याने एका दाम्पत्याचा मृत्यू झाला. दुर्दैवी बाब म्हणजे या दाम्पत्याला अवघ्या आठ महिन्याचे बाळ आहे. ही घटना ब्रह्मपुरी शहराजवळ घडली. या दुर्दैवी घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
आज दुपारच्या सुमारास ब्रह्मपुरी तालुक्यात विजेच्या कडकडाटासह पाऊस कोसळत होता. तालुक्यातील पारगाव येथील दाम्पत्य काही कामासाठी ब्रह्मपुरीला आले होते. काम आटपून गावाकडे दुचाकीने जात असताना अचानक विजेचा कडकडाट होऊन भगवती राईस मिल उदापूरजवळ दुचाकीवर वीज कोसळली. यात पती पिंटू मोतीराम राऊत (वय ३०) आणि पत्नी गुंजन पिंटू राऊत (वय २६) यांचा जागीच मृत्यू झाला.
विशेष म्हणजे या दाम्पत्याला आठ महिन्याचे एक बाळ आहे. ब्रह्मपुरी तालुक्यात यापूर्वीच पुराचा फटका बसल्याने अनेकांचे संसार कोलमडून गेले आहेत. यात अनेकांचे मोठे नुकसान झाले असून अनेकांचे दुःख हे न सांगण्यासारखे आहे. यातच दाम्पत्याचा वीज पडून मृत्यू होणे, ही घटना देखील तेवढीच दुर्दैवी आहे. दुचाकी चालवत असताना वीज पडेल, असे या दाम्पत्याला कदाचित स्वप्नातही वाटले नसेल. मात्र, या दुर्घटनेत त्यांनी अखेरचा श्वास घेतला. यामुळे परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा -ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना कोरोनाची लागण
हेही वाचा -राज्यात दिवसभरात २१ हजार ६५६ नव्या कोरोना रुग्णांची नोंद; ४०५ मृत्यू