चंद्रपूर :ब्रम्हपुरी वनविभाग हा झुडुपी जंगलासाठी ओळखला जातो. काही जंगल, काही शेत, काही नागरी वसती असा येथील भौगोलिक परिसर आहे. त्यामुळे येथे मानव वन्यजीव संघर्ष ही एक मोठी समस्या आहे. सध्या येथे दोन वाघांची दहशत आहे. वाघांनी अनेक ग्रामस्थ शेतकऱ्यांवर हल्ले केले आहेत. त्यामुळे 28 गावांत हायअलर्ट घोषित करण्यात आला असून तेथे सतर्कता बाळगण्यात येत आहे. दरम्यान सिंदेवाही येथे एका वाघाला पकडण्यात यश आले आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यात सर्वत्र मुसळधार पाऊस असताना ही मोहीम सुरु होती. या वाघाला गोरेगाव प्राणी संग्रहालयात स्थानांतरित करण्यात येणार आहे.
28 गावांमधे रेड अलर्ट : काही दिवसांपूर्वी ब्रम्हपुरी वनविभागाअंतर्गत येणाऱ्या तळोधी वनपरिक्षेत्रामधील सावरगांव व उश्राळारिठयेथे वाघाने काही व्यक्तींना आपली शिकार बनवले होते. याच दरम्यान चिमुर वनपरिक्षेत्रामधील डोमा या गावातील वनालगत असलेल्या शेतामध्ये वाघाच्या हल्ल्यामध्ये तिघांचा मृत्यू झाला. तर सिंदेवाही मध्ये देखील एका वाघाने अनेकांवर हल्ले चढवत त्यांचे बळी घेतले. या घटनांमुळे उत्तर ब्रम्हपुरी, दक्षिण ब्रम्हपुरी, तळोधी, चिमुर, नागभिड व सिंदेवाही या वनपरिक्षेत्रांतील 28 गावांना वन विभागाने रेड अलर्ट घोषित केले आहे.
युद्ध पातळीवर कारवाई : सध्या शेतीचा हंगाम सुरू असल्याने लोकांना बाहेर पडण्याशिवाय पर्याय नाही. अशावेळी काही जीवितहानी होऊ नये म्हणून वनविभागाने त्वरित याची दखल घेतली आहे. परिसरातील मनुष्यहानीच्या घटनेस कारणीभुत असणा-या वाघांची ओळख पटवून त्यांना तातडीने जेरबंद करणेबाबत वनविभागाकडून युद्ध पातळीवर कारवाई सुरू करण्यात आली. तसेच परिसरात कॅमेरा ट्रॅप लावण्यात आले आहेत. त्यामुळे सदर क्षेत्रात वावर असणा-या वाघांची त्वरीत ओळख करणे शक्य होईल.
पावसातही मोहीम सुरु : ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाची निष्णात असलेली चमु शार्प शूटर व पशुवैद्यकिय अधिकारी यांना वाघांना त्वरीत बेशुध्द करून जेरबंद करण्याकरिता तैनात करण्यात आले आहे. जिल्ह्यात सर्वत्र पाऊस सुरू असताना देखील ही मोहीम सुरु आहे. याच दरम्यान सिंदेवाही येथील वाघाला पकडण्यात चमुला यश आले. तर तळोधी येथील दुसऱ्या वाघाला देखील पकडण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. वाघ पकडला गेल्याने नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला आहे. या वाघाला थेट गोरेगाव येथील प्राणी संग्रहालयात ठेवण्यात येणार आहे.