महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

चंद्रपुरात मानवी तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; वीसहून अधिक मुली विकल्याची आरोपींची कबूली - human trafficking in chandrapur

दहा वर्षाच्या चिमुकलीला हरियाणात विकण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तब्बल दहा वर्षानंतर याचा खुलासा झाल्यानंतर दोन महिला आरोपींना पोलिसांनी अटक केली.

human trafficking in chandrapur
चंद्रपुरात मानवी तस्करी रॅकेटचा 'पर्दाफाश'

By

Published : Jan 10, 2020, 8:41 AM IST

चंद्रपूर - दहा वर्षाच्या मुलीला हरियाणात विकण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तब्बल दहा वर्षानंतर याचा खुलासा झाल्यानंतर दोन महिला आरोपींना पोलिसांनी अटक केली. या आरोपींनी जिल्ह्यातील जवळपास वीस मुलींना विकल्याची धक्कादायक कबूली दिली आहे. तसेच गुरुवारी आणखी एका महिलेला ताब्यात घेण्यात आले आहे. तिच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

चंद्रपुरात मानवी तस्करी रॅकेटचा 'पर्दाफाश'

मंदिरात खेळत असताना दिले गुंगीचे औषध

2010 मध्ये जून महिन्यात चंद्रपुरातील बंगाली कॅम्प परिसरातील एका दहा वर्षाच्या मुलीला गुंगीचे औषध देऊन तिला हरियाणात विकण्यात आले. यावेळी ती काली मंदिरात खेळत होती. यानंतर मागील दहा वर्षात तिच्यावर अत्याचार करण्यात आले. अल्पवयातच तिने दोन मुलांना जन्म दिला. दीड महिन्यांपूर्वी संबंधित मुलीला पुन्हा दीड लाखांना विकण्यात आले. मात्र, यावेळी हरियाणात पोलिसांनी तिची सुटका केली. रामनगर पोलिसांनी तिला चंद्रपुरात आणले. तिच्या सांगण्यावरून पोलिसांनी सावित्री रॉय आणि जान्हवी मजूमदार यांना अटक केली आहे. या दोघांनाही १० जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी मिळाली असून त्यांनी आतापर्यंत वीसहून अधिक मुलींना विकल्याची कबूली दिली आहे.

आंतरराज्य रॅकेटचा 'पर्दाफाश'

मुलींची विक्री हरियाणा, दिल्ली, राजस्थान, हिमाचल प्रदेशात करण्यात आली आहे. जुने कपडे विकण्याच्या बहाण्याने सावित्री आणि जान्हवी झोपडपट्टयांमध्ये रेकी करायच्या. गरीब घरातील सुंदर मुलींवर त्यांचे लक्ष असायचे. संधी मिळताच बेशुद्ध करून त्यांना दुसऱ्या राज्यात विक्रीसाठी पाठवून द्यायच्या, अशी माहिती तपासादरम्यान समोर आली आहे.

अधिक तपासात आरोपी तसेच मुलींच्या विक्रीचा आकडा वाढू शकतो, असे तपास अधिकाऱ्यांनी सांगितले. गीता मजुमदार या महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी या मानवी तस्करीची पाळेमुळे खोदून काढण्यासाठी आठ जणांचे विशेष पथक स्थापन केले आहे. यामधील आरोपींच्या अटकेसाठी विशेष पथक लवकरच राज्याबाहेर जाणार असल्याचे समजते.

ABOUT THE AUTHOR

...view details