चंद्रपूर - पहिल्यांदाच चंद्रपूर येथील लालपेठच्या माना टेकडी भागात दुर्मिळ समजले जाणारे हिमालयन गिधाड आढळून आले आहे. यामुळे पक्षीमित्रांकडून आनंद व्यक्त करण्यात येत आहे.
चंद्रपूरच्या माना टेकडी परिसरात खुली कोळसा खदान भागात वन्यजीव प्रेमी पराग लांडे यांना एक मोठा पक्षी उडताना आढळला. त्यांनी लगेच त्या पक्ष्याला कॅमेऱ्यात कैद केले. त्यांनी अधिक माहितीसाठी या पक्षाचा फोटो वन्यजीव अभ्यासक दिनेश खाटे यांना पाठवला आणि तो पक्षी हिमालयन गिधाड असल्याचे निष्पन्न झाले. तर, चंद्रपुरात हिमालयन गिधाड हे पहिल्यांदाच दिसल्याचे त्यांनी सांगितले.
हिमालयन गिधाड हे गुजरात, महाराष्ट्र वगळता दक्षिण भारतातल्या केरळ, तामिळनाडू, आंध्रप्रदेश व कर्नाटक या राज्यात आढळून आले. १० वर्षाआधी गिधाड पक्ष्याची प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर होती. 'डिक्लोफिनॅक' नामक औषधी वेदनानाशक म्हणून जनावरांना दिली जात होती. ही जनावरे मेल्यावर गिधाडांचा आहार बनत असे. परिणामी 'डिक्लोफिनॅक' ह्या औषधीमुळे गिधाडांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात घट झाली व त्यांची प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आली. बऱ्याच ठिकाणी गिधाड दिसेनाशी झाली होती, नंतर सरकारने 'डिक्लोफिनॅक' औषधावर बंदी आणली. तर, आंतरराष्ट्रीय प्रकृती संरक्षण संघाच्या यादीत हिमालयन गिधाड प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.
चंद्रपूर येथे हिमालयन गिधाड दिसल्यामुळे पुन्हा गिधाडांची प्रजाती तग धरत असल्याचे दिसून येते. यामुळे पक्षीमित्रांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. तरी, पक्षी मित्रांनी व वनविभागाने गिधाड प्रजातीबद्दलची जागरूकता लोकांमध्ये करणे गरजेचे आहे.